जालना: सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलंय. त्यामुळे राज्यातील गावोगावचे नागरीक सतर्क झाले आहेत. अनेक गावांनी गावात येण्याचे रस्ते बंद केलेत. तर अनेक ठिकाणी गाव सोडून ग्रामस्थ शेतीत राहायला गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र जालना जिल्ह्यातील वरुड खुर्द गावातील ग्रामस्थांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी थेट गावच्या प्रवेशद्वाराजवळच चूल तयार केली आहे. गावात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी हात पाय धुण्यासाठी दिवस रात्र पाणी उकळत ठेवलंय. या पाण्याने हात पाय स्वच्छ धुवून हाताला सॅनीटायजर लावल्यानंतरच या गावात सर्वांना प्रवेश मिळतो.
वगावात प्रवेश मिळवायचा असेल तर आधी तुमची गाडी थांबवून खाली उतरा. नंतर कढईतील गरम पाणी घ्या. हातात साबण घ्या. नंतर हात-पाय स्वच्छ धुवून हाताला सॅनीटायजर लावा. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील वरुड खुर्द गावाने ही कल्पना राबवली आहे. गावची लोकसंख्या जवळपास १ हजार ८०० इतकी आहे. पण गावातील लोक कोरोनाची जनजागृती करण्यात चांगलेच पटाईत असल्याचं आतापर्यंत केलेल्या कामांमुळे दिसून येतंय.
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याचं कळाल्यानंतर गावच्या सरपंचांनी भन्नाट आयडिया शोधली. गावच्या प्रवेश द्वारावरच चुलीवर भली मोठ्ठी कढई ठेऊन त्यात दिवसरात्र पाणी उकळत ठेवलं. सोबत साबण आणि सॅनीटायजर देखील ठेवलं. मग ठरलं की,कुणी गावात येणारा असो की गावातून बाहेर जाणारा गरम पाण्याने हात पाय स्वच्छ धुवून हाताला सॅनीटायजर लावल्याशिवाय कुणालाही प्रवेश द्यायचा नाही.
जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे त्यामुळे असा निर्णय आम्ही घेतलाय.व्यक्ती कुणीही असो हात-पाय स्वच्छ धुतल्यानंतरच आम्ही त्याला गावात प्रवेश देतो असे वरुड खुर्दचे सरपंच दगडुबा गोरे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
गेल्या १४ दिवसांपासून हाच नित्य नियम सुरू आहे. गावातील २ गावकरी गावच्या प्रवेश द्वाराजवळ उभे असतात. त्यांच्याच सेवेतून हा उपक्रम सुरू आहे. कोरोनाचा आजार वाढू लागल्यानंतर अनेक गावकरी शहरातून गावात दाखल झाले.या नागरिकांमुळे या आजाराला गावात निमंत्रण मिळू नये म्हणून गावाने एक कॅम्प देखील घेतला. कोरोना संदर्भात शासनाने घालून दिलेले नियम प्रत्येक गावकरी पाळतो. गावातल्या लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्वांच्या तोंडावर दिवस रात्र रुमाल बांधलेला पाहायला मिळतो.
गावातील प्रसिद्ध असलेलं मंदिर बंद करण्यात आलंय.पण मंदिराच्या पायरीवर प्रसाद ठेवण्यात आलाय. दर्शनाला आलेली व्यक्ती हा प्रसाद घेऊन मंदिराजवळ न थांबता निघून निमूटपणे निघून जाते. गावातील गिरणीत देखील रुमाल बांधूनच यावं लागतं. किराणा दुकानात गर्दी होत नाही. रिंगण मारलेल्या ठिकाणी उभं राहूनच किराणा माल ग्राहकांना खरेदी करावा लागतो. पाण्याच्या टाकीवर पाणी भरताना सुद्धा महिला तोंडाला रुमाल बांधूनच येतात. धुणे-भांडी करतानाही तोंडाला रुमाल बांधूनच धुणे-भांडी केली जाते.
आतापर्यंत जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित एक रुग्ण आढळून आलाय. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय.पण वरुड खुर्द गावानं कोरोनाचा बंदोबस्त स्वतःची यंत्रणा उभी करून केल्यानं या गावाचं कौतुक व्हायलाच हवं.