मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका अभियंत्याला मारहाण केल्याच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कालपासून सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांनी अभियंत्याला बेदम मारहाण केल्याचे फोटो आणि मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, जितेंद्र आव्हाड यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, यानंतर आता सोशल मीडियावरून एका तरुणाने आव्हाड यांना ‘तुमचा दाभोलकर करू’, अशी धमकी दिल्याने खळबळ माजली आहे. याशिवाय, अनेकजण सोशल मीडियावरुन आव्हाड यांच्यावर अर्वाच्च्य भाषेत टीका करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी केलेल्या दीपप्रज्वलनाच्या आवाहनावर आव्हाड यांनी टीका केली होती. यानंतर सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे (४०, रा. आनंदनगर, घोडबंदर रोड) यांनी आव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. यानंतर अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जाते. ५ एप्रिलला रात्री साध्या वेशात आलेले दोन पोलीस मला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला नेत असल्याचे त्यांनी सांगितले. पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीतून ते मला आव्हाड यांच्या विवियाना मॉलजवळ असलेल्या नाथ बंगल्यावर घेऊन गेले. बंगल्यावर १५ ते २० जणांनी मला बेदम मारहाण केली, असे अनंत करमुसे यांनी म्हटले होते. मात्र, आव्हाड यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ५ एप्रिलला दिवसभर मी विभागात फिरत होतो. यानंतर रात्री मी घरी येऊन झोपलो. मला या प्रकाराविषयी काहीही माहिती नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
परंतु, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेते आव्हाडांविरोधात आक्रमक झाले आहेत. आव्हाडांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी भाजप नेत्यांची मागणी आहे. तर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फोन करुन या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली. संबंधित मंत्र्यांना समज देण्याची विनंती केली. राज्यपालांनी ही विनंती मान्य केल्याचं सहस्त्रबुद्धे यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात निवडणुका एका टप्प्यात होणार का? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितले