महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधला. मात्र लॉकडाउनचं काय? हा प्रश्न अद्यापही कायम आहे. लॉकडाउन वाढणार की नाही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही संकेत दिले नाहीत. त्यामुळे लॉकडाउनबाबत संभ्रमावस्था कायम आहे. आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुक, ट्विटर आणि यू ट्युबच्या माध्यमातून संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधला मात्र त्यातून लॉकडाउन संपण्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
करोनाच्या लढाईत आरोग्ययंत्रणा, विभागीय आयुक्त, पोलीस हे अहोरात्र काम करत आहेत. मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मला कल्पना आहे कोरोनाचा रुग्ण आपल्या राज्यात सापडून आता चार आठवडे पूर्ण झाले. आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे, चिंतेची बाब असली तर घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करीत आहोत. आपल्याकडे मला रुग्णांमध्ये थोडीशीही वाढ नको असे मी सांगितले आहे. करोना आपल्यामागे लागला आहे पण आपण ही सर्व जण करोनाच्या मागे “हात धुवून” लागलो आहोत.
लॉकडाऊन मुळे आपली गैरसोय होते आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण हे युद्ध जिंकायचे असेल तर आपली घरे हेच गड किल्ले आहेत असे समजा. घरातले वातावरण आनंदी ठेवा. सर्व सुविधा वाढवतोय पण रोगाचे स्वरूप लक्षात घेता या सुविधा, उपकरणे प्रमाणित असणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे.
आपण जर घराबाहेर वस्तूंसाठी घराबाहेर पडणार असणार तेव्हा पुढचे काही दिवस मास्क वापरले पाहिजेत. त्यात गैर काहीच नाही. घरातल्या स्वच्छ कापडाने चेहरा कव्हर करता येऊ शकतो. पण छत्रीसारखा तो घरातल्या सर्व सदस्यांनी एकच वापरायचा नाही. वापरलेले मास्क कचऱ्यात तसेच फेकून न टाकता काळजीपूर्वक आणि सुरक्षित जागा पाहून जाळून टाका.
हे सगळे मुद्दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले खरे मात्र लॉकडाउन बाबत काहीही भाष्य केलं नाही. त्यामुळे लॉकडाउन संपणार का? संपला तर पुढे काय? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरीतच आहेत.

अधिक वाचा  महाराष्ट्र सत्तेचा नवा फॉर्म्युला अजित पवारांसाठी ‘सॉफ्टकॉर्नर’ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीही पद सोडल्याची चर्चा ; कोणाला किती मंत्रिपदं मिळणार