भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. किरीट सोमय्या यांना मुलुंड येथील त्यांचं निवासस्थान निलम नगर येथून अटक करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना अटक करुन मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला भेटण्यासाठी आपण चाललो असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सकाळी ११ वाजता भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या चालले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
“जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांना मारहाण केलेल्या अनंत करमुसे याला भेटण्यासाठी त्याच्या निवासस्थानी जात असताना मुंबई पोलिसांनी मला ताब्यात घेत रोखलं. मी सकाळी ११ वाजता त्याची भेट घेणार होतो,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.
यानंतर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी पोलिसांनी आपल्याला अटक केल्याचं म्हटलं आहे. “पोलिसांनी मला माझ्या निवासस्थानावरुन अटक केली असून नवघर पोलीस ठाण्यात नेत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
किरीट सोमय्या यांना अटक केल्याचा भाजपाकडून निषेध करण्यात आला आहे. “महाराष्ट्र सरकारला दिल्ली मरकजहून परतलेल्या तबलिगी जमातच्या लोकांना शोधायला वेळ नाहीये, पण सामान्य जनतेला मदतकार्य करणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना अटक करायला भरपूर वेळ आहे. जाहीर निषेध!!!,” असं ट्विट भाजपाकडून करण्यात आलं आहे.
प्रकरण काय आहे ?
राज्यात करोनानं चिंता वाढवलेली असताना जितेंद्र आव्हाड यांचं नाव एका प्रकरणामुळे मंगळवारपासून चर्चेत आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ठाण्यातील एका व्यक्तीनं जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.
माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही – आव्हाड
आरोप जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावले आहेत. “माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो. त्यामुळे रात्री घरी येऊन झोपलो. मी मारहाणीचे समर्थन करणार नाही, पण त्याने जी पोस्ट माझ्याबद्दल टाकली. तशी पोस्ट कोण सहन करेल? माझा नग्न फोटो टाकला होता. असे फोटो त्याच्या नातेवाईकांबद्दल टाकल्यावर तो गप्प बसेल का? भाजपाचे नेते तरी हे सहन करतील का?,” अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.

अधिक वाचा  मराठा आंदोलक मनोज जरांगे सहाव्यांदा उपोषण; मागण्या मान्य होणार का? सरकारची ही भूमिका स्पष्ट