तेल अवीव : इस्रायलने आर्टिफिशिअल इंटिलिजेन्स चलित मॉनिटरिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करोनाचे हॉटस्पॉट ओळखले आणि हे संकट लवकरच आटोक्यात आणलं. हेच तंत्रज्ञान आता भारतातील हॉटस्पॉट ओळखण्यासाठी वापरलं जाणार असल्याची माहिती इस्रायलने दिली आहे. हे तंत्रज्ञान विकसित केलेल्या कंपनीनेच या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचं द जेरुस्लेम पोस्टच्या वृत्तात म्हटलं आहे.
इस्रायल आणि भारत या देशांची मैत्री जुनी आहे. संकटाच्या काळात नेहमीच दोन्ही देश एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. तेल अवीवमधील डायग्नॉस्टिक्स रोबोटिक्सने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. आपत्कालीन कक्ष आणि खाजगी फिजिशिअनसाठी हे तंत्रज्ञान सुरुवातीला विकसित करण्यात आलं होतं. पण करोनाविरोधात लढा देण्यासाठी या तंत्रज्ञानाने मोठी भूमिका निभावली आहे. गेल्या काही आठवड्यात करोनाचा प्रसार रोखण्यात इस्रायलला चांगलं यश मिळालं आहे.
करोनाचे जगभरातील आर्थिक आणि वैद्यकीय परिणाम काय होतील हे दिसत होतं. सर्व विकसित तंत्रज्ञान करोनाच्या लढाईसाठी वापरण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती डायग्नॉस्टिक रोबोटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी योनातन अमिर यांनी द जेरुस्लेम पोस्टला दिली.
या कंपनीकडे १०० जणांची टीम आहे. ज्यात ३० दिग्गज डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या सर्वांनी एक आठवडा दिवसरात्र काम करुन इस्रायल सरकारसाठी योग्य तो प्लॅटफॉर्म विकसित केला. इस्रायलच्या आरोग्य यंत्रणेकडूनही हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. हेच तंत्रज्ञान आता ओदिशामध्ये तैनात केलं जाणार आहे. इथे लाखो नागरिकांना विविध प्रश्न विचारले जातील आणि त्यांची चाचणी होईल. ओदिशामध्ये एकूण ३९ रुग्ण आढळले असून यापैकी ३२ राजधानी भुवनेश्वरमधील आहेत.
ओदिशामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला अत्यंत महत्त्वाची ठरतील, असं डायग्नॉस्टिक रोबोटिक्सचं म्हणणं आहे. शिवाय कंपनीने हे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करुन दिलं आहे. अमेरिका आणि युरोपातही याची मदत घेतली जाणार आहे.