पुणे: महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे शहरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. पुण्यात मागच्या काही तासांत करोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोना बळींची संख्या १३ वर गेली आहे.
पुणे शहरात रोजच्या रोज नव्या रुग्णांची नोंद होत आहे. काल मध्यरात्रीनंतर ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नायडू, ससून व हडपसर येथील नोबेल रुग्णालयात बहुतांश करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यातील पाच जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात ससून रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे. मृतांमध्ये एक ५० वर्षीय महिला आहे. अन्य दोघे हडपसर आणि कोंढाव्यातील राहणारे होते. यापैकी एकाचे वय ५४ तर दुसऱ्याचे वय ७१ वर्षे होते.
नायडू रुग्णालयात एका ४४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला अनियंत्रित मधुमेहाचा आजार होता. त्यातच त्याचं मूत्रपिंडही निकामी झालं होतं. ४ एप्रिलपासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज अखेर त्यानं प्राण सोडला.
हडपसर येथील नोबेल रुग्णालयात एका ७३ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ते सय्यदनगर येथील राहणारे होते. त्यांना मधुमेहाचा आजार होता.

अधिक वाचा  पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजला टाळे ठोकले, ८०० विद्यार्थ्यांना बाहेर काढले, भवितव्य अंधारात