मुंबई : करोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका सध्या अमेरिकेला बसत आहे. या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिका प्रयत्न करत आहे, पण अजूनपर्यंत त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतानं जर हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन (hydroxy chloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर अमेरिका या विरोधात कारवाई करेल असे संकेत दिले. या नंतर अभिनेते विपिन शर्मा यांनी केंद्र सरकारवर ट्विट करून टीका केली आहे.
२४ फेब्रुवारी आणि २५ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. ट्रम्प यांच्या या दौऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष काळजी घेतली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भेटीसाठी १०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. विपिन शर्मा यांनी याचाच संदर्भ घेऊन मोदी सरकावर निशाणा साधाला आहे. ‘देशातील गरिबी लवण्यासाठी केलेल्या आणि त्यांच्या स्वागतासाठी खर्च केलेल्या पैशांचं काय झालं? असं ट्विट विपिन यांनी केलं आहे. विपिन शर्मा यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी त्यांचं समर्थन केलं आहे.
जागतिक महामारी घोषित करण्यात आलेल्या करोना व्हायरसच्या विळख्यात आतापर्यंत अनेक देश आले आहेत. त्यातही इटली, स्पेन यांसारख्या विकसित देशांनीही या व्हायरससमोर गुडघे टेकले आहेत. अमेरिकेच्या आशा आता भारताकडून मिळणाऱ्या मदतीवर टिकून आहे. ट्रम्प यांच्या मते, करोनाच्या उपचारांमध्ये हाइड्रोक्सीक्लोरोक्वाइन औषधाचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे.