देशात सर्वत्र लॉकडाउन आहे. या परिस्थितीत एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नातेवाईकांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येत नाहीय. अशावेळी शेजारीच मदतीला धावून येत आहेत. मध्य प्रदेशात इंदूरमध्ये एका हिंदू महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मुस्लिमांनी मदत केली.
या महिलेच्या अंत्ययात्रेत मुस्लिम शेजाऱ्यांनी खांदा दिला. करोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. त्यावेळी या मुस्लिम तरुणांनी महिलेच्या मुलाला अंत्यसंस्कारासाठी मदत केली. सोशल मीडियावर या प्रसंगाचे व्हिडीओ आणि फोटो मोठया प्रमाणावर शेअर होत आहेत. या मुस्लिम युवकांनी अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था केली.
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. आधीपासूनच आजारी असलेल्या या ६५ वर्षीय महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. तिला दोन मुले आहेत. आईचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर ही मुले बऱ्याच वेळाने घरी पोहोचली. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे त्यांना घरी पोहोचायला उशीर झाला. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मुस्लिम युवकांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक केले आहे. या युवकांनी समाजासमोर एक चांगले उदहारण ठेवले आहे असे कमलनाथ म्हणाले.

अधिक वाचा  मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, भाजपच्या कोअर कमिटीची 5 तास खलबतं, पडद्यामागे चाललंय काय ?