मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाच्या वाटेतील मोठा अडथळा झाल्यामुळे आता मंत्रीमंडाळील प्रत्येक व्यक्ती आपल्या परिने नागरिकांना त्यांच्या घरातच थांबण्याचं आवाहन करत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने जनतेला दिलासा आणि धीर देत आहेत. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा त्यांचं कर्तव्य बजावत वेळोवेळी नागरिकांना घरातच राहण्याचा इशारा देत आहे.
एका दिवसावर आलेल्या हनुमान जयंतीचा उत्सव आणि या दरम्यान राज्यातील बऱ्याच भागांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पालख्या, देवाच्या जत्रा हे चित्र यंदाच्या वर्षी मात्र दिसणारम नाही. या दिवसाचं महत्त्व पाहता खुद्द अजित पवार यांनी नागरिकांना एक आवाहन केलं आहे. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर, हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असं सांगून हनुमान जयंतीला, बुधवारी घराबाहेर न पडण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
मुस्लिम धर्मियांनीही बुधवारी शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असंही त्यांनी म्हटलं. कोरोनासंसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोनाची साखळी तोडणं, ही आपली जबाबदारी आहे हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
पुढील सूचना येईपर्यंत सर्व सण- उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्यं ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये. असं त्यांनी केलं.
बंदी आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
ज्या भागांमध्ये बंदीचे आदेश देण्यात आले आहेत तेथे या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला. कोरोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोनाप्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील असं त्यांनी स्पष्ट केल
जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा
अजित पवार यांनी आजच्या जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्तानं राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य संघटनेचं महत्वं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं मत त्यांनी मांडलं.

अधिक वाचा  सांगलीत काँग्रेसचा ‘बाहुबली’ होतोय, पण ‘कटप्पा’च्या भूमिकेत कोण? हे पोस्टर व्हायरल राजकीय वर्तुळात चर्चा