सध्याच्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नोकरी संकटात आलेली असताना, घरात एक दिवस पुरेल एवढेच अन्न..जवळ पैसेही नाहीत, त्यात आठ महिन्यांच्या बाळाचीही जबाबदारी असल्याने अशा परिस्थितीत पोट कसं भरायचं? हा यक्ष प्रश्न पिंपरी-चिंचवड भागात राहणाऱ्या एका परप्रांतीय दाम्पत्यासमोर निर्माण झाला होता. अखेर, बाळाच्या आईने उत्तर प्रदेश येथे राहात असलेल्या आपल्या भावाला फोन करून येथील परिस्थितीबाबत माहिती दिली.

त्यानंतर काही तासांमध्येच पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून या दाम्पत्यास अन्नधान्य मिळाले. हे सर्व सांगत असताना पूजा सिंग यांच्या डोळ्यात पाणी आले. आई म्हणून त्यांना आपल्या बाळाची चिंता सतावत होती. सध्या करोना विषाणूमुळे अनेकांचे संसार उघडयावर आले असून दोन वेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे, याचेच हे एक उदाहरण आहे.

अधिक वाचा  लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार, रक्षाबंधनाला खात्यात 3 हजार रुपये जमा होणार!

पूजा सिंग आणि इंद्रभूषण सिंग यांना एक आठ महिन्याचे बाळ आहे. पत्नी आणि बाळाच्या आजारावर इंद्रभूषण सिंग यांचे अगोदरच पैसे खर्च झाले आहेत. ते एका खासगी कंपनीत काम करतात. महिन्याकाठी काही हजार रुपये हातावर येत. परंतु, सर्व संसारात कुठे जात होते हे समजत नव्हते. अशातच करोनारुपी संकट ओढावले व आता नोकरी देखील जाण्याच्या मार्गावर असून आहे तो पगारही मिळतो की नाही, अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी अवघा देश बंद ठेवला असून याचा थेट परिणाम सामान्य कुटुंबावर होताना दिसत आहे.
हे कुटुंब एका दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहते. लॉकडाउनमुळे त्यांनी सर्व रेशन घेतलं होतं. मात्र, ते केवळ काही दिवसच पुरलं आणि आता आपल्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते असे त्यांना वाटू लागले. कारण, घरात एक दिवस पुरेल एवढेच अन्न होते. सर्व काही संपलं होत. पूजा सिंग यांना बाळाची चिंता सतावत होती. काय करावं समजत नव्हतं. तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेश येथील भावाला फोन करून सर्व हकीकत सांगितली.

अधिक वाचा  जैन मंदीरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त दंत व डोळे तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

भावाने पोलिसांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी मुंबई येथे सांगितले. मुंबईवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांना मदतीसंदर्भात सांगण्यात आले. यानंतर सर्व माहिती घेऊन या कुटुंबाला काही दिवस पुरेल एवढे रेशन पोलिसांनी घरी येऊन दिल. पोलिसांनी केलेली मदत या कुटुंबासाठी खूप महत्त्वाची होती. पूजा यांनी दोन्ही हात जोडून पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. पोलीस देवा सारखे धावून आल्याचे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या अवघ्या देशात पोलीस रस्त्यावर उतरून आपलं कर्तव्य तर बजावत आहेत. पण, गरिबांना अशीही मदत करून ते जगासमोर एक वेगळा आदर्श ठेवत आहेत.