‘करोना विषाणूविरुद्ध लढाई दीर्घकाळ सुरू राहील… या दरम्यान हा थकायचं, ना हरायचं…’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कालच्या संबोधनात म्हटलं होतं. त्यानंतर मंत्रिमंडळाची एक बैठकदेखील पार पडली. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलताना केंद्र सरकारकडून तब्बल २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. हा निर्णय नक्कीच कठीण होता. त्याचे परिणामही मोठे आहेत. परंतु, आरोग्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेणं अटळ होतं. आता २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिकांचा गोंधळ उडू नये यासाठी त्याचंही नियोजन करणं गरजेचं आहे. पण, २१ दिवसांचा लॉकडाऊन इथेचं संपणार का? हा प्रश्न अद्यापही कायम आहे. याचंच कारण म्हणजे दिवसेंदिवस करोना रुग्णांची वाढत जाणारी संख्या… परंतु, अद्याप या प्रश्नावर ठोस असं उत्तर मिळालेलं नाही.
लॉकडाऊन उठवताना…
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू झालं तेव्हाही जवळपास सगळ्याच राज्यांत अगोदरपासूनच लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं होतं. राज्य सरकारांचा हाच निर्णय देशव्यापी स्तरावर लागू करण्यात आला. त्याचपद्धतीनं लॉकडाऊन उठवतानाही त्यामध्ये नियोजन असणं गरजेचं राहणार आहे. देशव्यापी लॉकडाऊन संपवताना ते एकदमच उठवणं शक्य नाही… त्यामुळे पहिल्यांदा लॉकडाऊन सीमित स्वरुपात उठवून त्यानंतर टप्प्याटप्प्यानं उठवावं लागेल. करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणांवर मात्र ही बंदी कायम राखावी लागेल.
करोना हॉटस्पॉटबद्दल वेगळा निर्णय?
देशव्यापी लॉकडाऊन उठवल्यानंतर छोट्या छोट्या भागांत किंवा ‘करोना हॉटस्पॉट’ ठरलेल्या भागांबाबत वेगळा निर्णय घेणं गरजेचा आहे. आता हा निर्णय केंद्र स्तरावर घेतला जाईल की राज्य स्तरावर हेदेखील लवकरच स्पष्ट होईल. सध्यातरी २१ दिवसांचं लॉकडाऊन १४ एप्रिलपुढेही वाढवलं जाणार का? यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु, सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा संपर्क संपूर्णत: बंद ठेवावा तसंच लहान मुलं आणि वृद्धांना घरीच राहण्याचा संदेश दिला जावा, असेही मुद्दे चर्चेदरम्यान समोर आले.
रेल्वे आणि बस सेवेचं काय?
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनचा कालावधी संपत असला तरी देशभर रेल्वे सुरु करण्याबाबत अजूनही जबरदस्त सस्पेन्स कायम आहे. करोना फैलावच्या दृष्टीनं रेल्वे बंद राखण्याचा निर्णय पुढेही काही दिवस कायम ठेवला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. परंतु, मर्यादित स्वरुपात काही रेल्वे सुरू करण्याच्या माहितीवर मात्र अधिकाऱ्यांनी नकार दिलेला नाही. इतर सरकारी आणि खासगी गाड्या, बाईक यांवर स्थिती पाहून सरकार निर्णय घेणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पर्यायही १५ एप्रिलनंतर लगेचच सुरू होईल अशी शक्यता कमीच आहे.
दुकानांचं काय?
करोना लॉकडाऊननंतर नागरिकांची काम-धंदे बंद आहेत. काही जण शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा वापर करत आहेत परंतु, दुकानादारांचा धंदा मात्र पूर्णत: ठप्प झालाय. परंतु, परिस्थिती बिघडली आणि करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखीन वाढ झाली तर त्यांना लगेचच दिलासा मिळणं थोडं कठीणच आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला काही रेस्टॉरन्ट सुरू केले जाऊ शकतात. परंतु, परिस्थिती लक्षात घेताना केवळ ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु केली जाऊ शकते… रेस्टॉनन्टमध्ये बसून खाण्याची सेवा बंदच राहू शकेल.
तुम्ही कार्यालयात जाऊ शकाल?
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्यालय सुरू करण्यावरही चर्चा झाली. ज्या ज्या भागांत करोनाचा प्रभाव दिसून आलेला नाही अर्थात जे विभाग करोना ‘हॉटस्पॉट’ नाहीत अशा भागांत सरकारी विभाग हळूहळू सुरू केले जाऊ शकतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचवलं आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर करता येतील अशा सगळ्या कामांची चाचपणी येत्या ८ दिवसांत करण्याचे आदेश सगळ्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत. खासगी कंपन्यांनाही परिस्थिती पाहून वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत.
‘हॉटस्पॉट’वर १२ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार?
करोनानं देशातील ६२ जिल्हे बेजार झाले आहेत. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, अशा ६२ जिल्ह्यांत लॉकडाऊन २८ दिवस अर्थात १२ मेपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवण्यात आला आहे. इतर ठिकाणीही नागरिकांची एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करू शकतील, असं रोस्टर तयार करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. यासाठी ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही मार्ग सूचवण्यात आलाय.
लॉकडाऊन वाढवण्याचे राज्यांना संकेत
केंद्रानं अद्याप अंतिम निर्णय घेतला नसला तरी काही राज्यांना लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे संकेत दिले गेले आहेत. उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी मात्र १४ एप्रिलनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहू शकेल, असे संकेत दिले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही लॉकडाऊनचा कालावधी आणखी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. तेलंगणामध्ये ३ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी करण्यात आल्याचीही माहिती आहे.
शेतीसोबतच बांधकाम क्षेत्राला सूट?
सध्या, लॉकडाऊनच्या काळातही शेतीकामांना सूट मिळालेली आहे. याचसोबत लॉकडाऊननंतर पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या कामांना सुरू करण्याची सरकार तयारी करत आहे. तसंच छोट्या मोठ्या बांधकामांना सूट मिळू शकते. हातावर पोट असणाऱ्या मजुरांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसलेला दिसत आहे. त्यांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी कोविड १९ चा फैलाव नसणाऱ्या भागांमध्ये ही कामं सुरू करता येऊ शकतील. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन गरिबांच्या हातात काही पैसे येऊ शकतील.
सरकारी कार्यालयांत कामाची पद्धत बदलणार
अर्थव्यवस्थेला सुरळीत सुरू करणं, हेच सध्या सर्वात मोठं आव्हान आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत येत्या आठ दिवसांत लॉकडाऊननंतर काम कसं सुरू करता येईल, याचा पेपरवर्क तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करू शकतील, असं रोस्टर तयार करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. यासाठी ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही मार्ग सूचवण्यात आलाय. तसंच ‘वर्क फ्रॉम होम’चाही विचार सुरू आहे.