छपराः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. आतापर्यंत शेकडो जणांचा करोनाने बळी घेतला आहे. पण अनेक वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीला करोनामुळे आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली. ७ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला मुलगा करोनाच्या संकटाने पुन्हा मिळाला आहे. छपरामधील मित्रसेन गावातला हा प्रकार आहे.
मित्रसेन गावातले ग्रामस्थ बाबुलाल दास यांचा मुलगा अजय कुमार उर्फ विवेक दास हा ७ वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला. पण तो काही सापडला नाही. दोन-तीन वर्षांनतरही तो घरी आला नाही. मग तो जिवंत नाही असं समजून घरच्यांनी त्याचा विचार सोडून दिला. त्यांनी त्याचा शोध घेणंही बंद केलं. पण एक दिवस आपला मुलगा नक्की घरी परतेल, अशी आशा आई-वडिलांना आशा होती.
उत्तर प्रदेशातील तुरुंगात होता तरुण
सोमवारी उत्तर प्रदेश पोलीस एका युवकाला घेऊन भेल्दी पोलीस ठाण्यात दाखल झाले. अजय कुमार उर्फ विवेक दास असे नाव सांगून विचारणा करू लागले. यूपी पोलीस अजयला घेऊन त्याच्या मित्रसेन गावी पोहोचले. घरातून बेपत्ता झाल्यानंतर अजय भरकटत उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे पोहोचला. तिथे एका गुन्ह्यात त्याला तुरुंगवास झाला आणि तो शिक्षा भोगत होता. करोनाच्या प्रादुर्भावाने काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यात अजय कुमारचं नावही होतं, असं पोलिसांनी घरच्यांना सांगितलं. मुलगा घरी आल्याने अजयचे वडील बाबुलदास अतिशय आनंदीत झाले. करोनाचे संकट आले नसते तर अजय परतला नसता, असं गावकरी म्हणाले.