मुंबई : दिल्लीतल्या मरकज प्रकरणानंतर तबलिगी समाजाचं नाव देशभर झालं. त्यांच्यावर प्रचंड टीकाही होत आहे. तबलिगी समाजाच्या कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर देशभर कोरोनाचं संक्रमण झालं. त्यानंतर समाज माध्यमांवर अनेक खोटे व्हिडीओ व्हायरल झाले. आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या तबलिगी समाजातल्या ज्येष्ठ मंडळींची त्यांनी आज भेट घेतली. दिल्ली प्रकरणानंतर काही समाजकंटक सामाजिक सौहार्द बिघडविण्याचं काम करत आहेत. त्यांचं कारस्थान यशस्वी होणार नाही याची सर्वांनी मिळून काळजी घेतली पाहिजे असं राजेश टोपे यांनी सांगितलं. तर सर्व जमातल्या सर्व नेत्यांनीही त्याला योग्य प्रतिसाद दिल्याचही टोपे यांनी म्हटलं आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा 3500 च्या वर गेला आहे. त्यात मृतांचा आकडा 75 च्या पुढे गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यातही इतर राज्याच्या तुलनेत केवळ मुंबई (Mumbai Covid -19) शहराचा आकडा खूप मोठा आहे. यामुळे येत्या काळात बीएमसीला अधिक कडक पावले उचलावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासात 8 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसांत 108 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले असून आज दिवसभरात मुंबईत ५३ रुग्णं वाढले आहेत. गेल्या तीन दिवसांत 8 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या 8 जणांपैकी 2 जण वयोवृद्ध होते.
तर या 2 जनांसह एकूण 6 जण आधीपासूनच खूप दिवस आजारी होते. त्यामुळे आता मुंबईत एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या 433 इतकी झाली आहे. आता पर्यंत केवळ मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. काल आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धारावी या भागात तब्बल 7 ते 8 लाख नागरिक राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाचा फैलाव जलद गतीने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.