करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना आज (५ एप्रिल) रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील विजेवर चालणार प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती, दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनावरून नेटकरी आणि विरोधकांनी टीकेची झोडही उडवली आहे. विरोधकांच्या या टीकेला राज्यातील भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत मोदींच्या आवाहनामागील कारण सांगितले आहे.
दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माहित आहे. पण या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते. जे वाढणे आजच्या संकट समयी काळाची गरज आहे, असं ट्वट मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुनगंटीवार यांनी ट्विटमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी मोदींनी केलेल्या आवाहन का महत्वाचं आहे ते सांगितलेय. मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये पाच मुद्दे मांडले आहेत. त्या मुद्यातून त्यांनी मोदींचं आजचं आवाहन कसं योग्य आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेताजी बोस, बाबासाहेब आंबेडकर आणि रामदास स्वामी यांच्या काही घोषणांचा आढावा दिलाय.
काय आहेत मुद्दे ?-
१) केवळ हर हर महादेव करून युद्ध जिंकता येत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होते.
२) निव्वळ चले जाव ची घोषणा देऊन इंग्रज पळून जाणार नाहीत, हे महात्मा गांधींनाही माहित होते.
३) तळ्याचे पाणी पिल्याने जातीयता नष्ट होणार नाही, हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही माहित होते.
४) रक्त मागून स्वतंत्र मिळणार नाही, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना माहित होते.
५) जय रघूवीर समर्थ म्हणून जमसमुदाय एकत्र येणार नाही, हे रामदास स्वामींनाही माहित होते.
त्याचप्रमाणे दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनाही माहित आहे. पण या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते. जे वाढणे आजच्या संकट समयी काळाची गरज आहे.
मोदी यांनी काय केलेय आवाहन?
लॉकडाउनच्या काळात सर्व भारतीयांन अनुशासन दाखवले. सर्वांनी मिळून करोनाविरूद्धचा लढा दिला आहे. करोनाशी लढण्यासाठी देश एकवटला. भारतीयांनी कायदा आणि सेवाभाव याचे जे दर्शन घडवलं आहे ते अतुलनिय आहे. शासन, प्रशासन आणि जनतेने एकत्रपणे या संकटाचा आतापर्यंत योग्य प्रकारे सामना केला आहे. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे मालवून गॅलरीत उभे राहून मेणबत्ती, दिवे मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा. आपण सर्वजण मिळून करोनाच्या या अंधकाराला मिटवूयात. घरातील सर्व लाईट बंद असेल सर्वजण एक एक दिवा लावेल त्यावेळी प्रकाश चारी बाजूनं पडेल आणि आपण सर्वजण सोबत असल्याची भावना निर्माण होईल. यावेळी असा संकल्प करा की आपण सोबत आहे.