देशाबरोबरच राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. भारतात करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झाले आहेत. राज्य सरकारकडून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करोनानंतर देशावर तसेच राज्यावर येणाऱ्या संभाव्य संकटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पवार यांनी आपल्या ट्विटवर हॅण्डलवरुन काही ट्विट करत यासंदर्भातील चिंता व्यक्त केली आहे.
करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे आणि कंपन्या बंद आहेत. अनेक व्यवसाय ठप्प झालेले आहेत. त्यामुळे या लॉकडाउनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणातून चिंता व्यक्त करत कोव्हीड फंडची स्थापना केल्याची माहिती दिली होती. उद्धव ठाकरे यांनाही जनतेशी संवाद साधताना ‘या सर्वांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे याची आम्हाला कल्पना आहे पण सध्या जीव वाचवणं महत्वाचं आहे,’ असं सांगत चिंता व्यक्त केली होती. आता शरद पवार यांनी अर्थव्यवस्थेबरोबरच करोनानंतर बेरोजगारी वाढेल अशी चिंता ट्विटरवरुन व्यक्त केली आहे.
अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम बेरोजगारी वाढणार
करोनाच्या संकटाचा अनेक घटकांवर परिणाम होणार असल्याचा इशारा पवारांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. तसेच यासंदर्भात काय करता येईल याबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. “पुढील काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्या म्हणजे देशाच्या अर्थकारणावर व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम. करोनाच्या संकटाचा परिणाम अनेक घटकांवर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत आहे की पुढील काळात रोजगार कमी होऊन, बेरोजगारी वाढण्याचे संकट हे फार मोठे असणार आहे. यासाठी मी राज्याचे मा.मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे की, पुढील काळात तज्ज्ञ, जाणकार लोकांना एकत्र आणून उपाययोजनांची चर्चा करावी,” असं पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुढील काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्या म्हणजे देशाच्या अर्थकारणावर व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम. कोरोनाच्या संकटाचा परिणाम अनेक घटकांवर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. #letstogetherfightcovid19 #CoronavirusPandemic
…तर शेतकऱ्यांवर परिणाम होईल
माजी केंद्रीय कृषीमंत्री असणाऱ्या पवारांनी शेतकऱ्यांबद्दलही काळजी व्यक्त केली आहे. “शेती व्यवसायाला योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आपल्या देशात गव्हाचे उत्पादन उत्तरेकडे व तांदळाचे दक्षिण भारतात होते. आता रब्बी हंगाम पूर्ण होत आहे,शेतात पिके उभी आहेत. ती काढली नाहीत तर शेती अर्थव्यवस्थेवर व शेतकऱ्यांवर परिणाम होईल. याकडे केंद्राने लक्ष द्यायला हवे,” असे मत पवारांनी व्यक्त केलं आहे.
पुढील काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्या म्हणजे देशाच्या अर्थकारणावर व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम. कोरोनाच्या संकटाचा परिणाम अनेक घटकांवर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. #letstogetherfightcovid19 #CoronavirusPandemic
सणवारासंदर्भात काळजी घेणे गरजेचे
“लोकांना एकत्रित येण्यासाठी काही सण वा प्रसंग कारणीभूत ठरतील का, याची काळजी आतापासून घेणे गरजेचे आहे. आज महावीर जयंती आहे, ८ तारखेला शब-ए-बारातचा कार्यक्रम आहे, सर्वांनी घरी थांबूनच हे कार्यक्रम संपन्न करावेत, घरूनच आपली प्रार्थना करावी, अशी विनंती आहे,” असं आवाहनही पवारांनी ट्विटवरुन केलं आहे.
देशातील करोना परिस्थितीबद्दल म्हणाले…
शरद पवार यांनी तब्बल १५ ट्विट केले आहेत. करोनाशीसंबंधित वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी यामधून भाष्य केलं आहे. “देशात लॉकडाऊन जाहीर झाले त्याचा आजचा हा तेरावा दिवस आहे. अजून आठ दिवस बाकी आहेत. या उर्वरित दिवसांत ज्या सूचना केल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. इतर देशांचे चित्र पाहिल्यास ते अधिक भयावह आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ४०६७ कोरोना केसेस आहेत. त्यापैकी ३७६६ केसेस अॅक्टिव्ह आहेत. त्यांची काळजी वैद्यकीय क्षेत्रातील लोक काटेकोरपणे घेत आहेत. देशात ११८ मृत्यू झाले असून ३२८ रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत,” असं पवारांनी पहिल्या दोन ट्विटमध्ये म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ४०६७ कोरोना केसेस आहेत. त्यापैकी ३७६६ केसेस अॅक्टिव्ह आहेत. त्यांची काळजी वैद्यकीय क्षेत्रातील लोक काटेकोरपणे घेत आहेत. देशात ११८ मृत्यू झाले असून ३२८ रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. #CoronaVirusUpdates व्हॉटसअॅपवर येणाऱ्या मेसेजेसबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज असून यातील पाचपैकी चार मेसेज हे खोटे असतात, असं पवार यांनी पुढील ट्विटमध्ये म्हटलं आहे. “आपण योग्य काळजी घेतली तर इतर रुग्णांनाही या आजारातून बाहेर काढू शकतो. यासाठी सरकारने केलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करूया. या सगळ्या परिस्थितीत सर्व समाजाला एकत्र राहण्याची गरज आहे. जात-धर्म न पाहता एक सामाजिक सलोखा सगळ्यांनी जपण्याची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर सध्या जे मेसेजेस येत आहेत त्यातून अफवा पसरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होतेय. विशेषतः व्हॉटसअॅपवर येणाऱ्या मेसेजेसबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. यातील पाचपैकी चार मेसेज हे खोटे असतात. त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण करण्याचे कोणाचे प्रयोजन आहे का अशी शंका येते,” असं पवार म्हणाले आहेत.
मरकजसारख्या संमेलन्नांची आवश्यकता नव्हती…
“(करोनाच्या) या काळात हजरत निजामुद्दीनमधील मरकजसारखे संमेलन होण्याची आवश्यकता नव्हती. महाराष्ट्रातही असा कार्यक्रम घेण्याची मागणी केली होती. मात्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही परवानगी नाकारली. हीच भूमिका दिल्लीत घेतली गेली असती तर सांप्रदायिक तेढ वाढण्याची संधी मिळाली नसती. सोलापुर जिल्ह्यातील घेरडी या गावी बैल व घोडा शर्यतींच्या निमित्ताने हजारो लोक एकत्र आले. पण या आयोजकांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. तशीच कारवाई दिल्लीत होणे गरजेचे होते. तसेच दिल्लीत जे घडले ते रोज टीव्हीवर दाखवणे गरजेचे आहे का याचाही जाणकारांनी विचार करावा,” असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.
आपण इतिहास रचू…
करोनाविरुद्धचा लढा आपण नक्की जिंकू असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. “सध्या आपणा सर्वांना एक निश्चय करायचा आहे. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनावर मात करायची आहे. करोनाविरोधात जिंकण्याचा इतिहास आपण रचू, असा विश्वास मला आहे,” असं पवार १५ व्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारीच मोट बांधण्यामध्ये पवारांचा सर्वात मोठा वाटा होता. त्यामुळेच आता राज्यासमोरील या संकटांबद्दलचे भाष्य पवारांनी करत राज्यातील सरकारने वेळीच उपाययोजना करण्यास सुरुवात करायला हवी असे संकेत दिले आहेत.