करोनाने जगभरात थैमान घातलं असून यामध्ये जपानचाही समावेश आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहे, मात्र याचा फैलाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नाही. जगभरातील १० लाख लोक करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान देशात करोनाचा फैलाव वाढत असल्याने जपाना आणीबाणी घोषित करण्याच्या तयारीत आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे मंगळवारी देशाला संबोधित करणार आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंजो आबे यांनी सांगितलं आहे की, करोनाशी लढा देण्यासाठी आपण आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमध्ये सध्या करोनाचे ४५६३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये डायमंड प्रिंसेस जहाजावरील ७०० प्रवाशांचा समावेश आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, जपान सरकार सहा महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर करण्याचा विचार करत आहे. जेणेकरुन लोक आपल्या घरातच थांबतील आणि करोनाचा फैलाव रोखता येईल. जपानमधील टोकियो, ओसाका सहित अन्य ठिकाणी करोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, जपानमध्ये सोमवारी सकाळपर्यंत करोनाची ३००० हून जास्त प्रकरणं समोर आली आहेत. तर ८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अर्ध्याहून अधिक प्रकरणं गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये समोर आली आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा फैलाव झपाट्याने होईल अशी सरकारला भीती आहे. जगभरातील परिस्थितीवरुन एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे ज्या देशांनी लॉकडाउन करण्यात उशीर केला त्या देशांना करोनाचा मोठा फटका बसला आहे.
जगभरातील मृतांची संख्या ७० हजारावर
जगभरातील जवळपास १२ लाख लोक करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. तर मृतांची संख्या ७० हजारांच्या आसपास आहे. मृतांच्या बाबतीच सध्या इटली पहिल्या क्रमांकावर आहे. इटलीत करोनामुळे १५ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत तीन लाख लोक करोनाशी लढा देत आहेत. तर नऊ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा  रात्र वैऱ्याची, दगाफटक्याचा धसका, मुख्यमंत्रीही रात्रभर हॉटेलमध्ये मुक्कामाला, प्रत्येक पक्षात हालचालीही सुरू