लष्कर आणि निमलष्कराच्या जवानांना अनेक महिने घर आणि कुटुंबीयांपासून दूर राहावं लागतं. महिना-दोन महिन्यांच्या सुट्टीत त्यांना कुटुंबीयांबरोबर राहण्याची संधी मिळते. नाशिकमध्ये अशाच सुट्टीवर आलेला एक लष्करी जवान लॉकडाऊनच्या काळात चक्क पोलिसांबरोबर रोज बारा-बारा तास ड्युटी करत आहे. सीमेचं रक्षण करताना आणि नाशिकसारख्या शहरात ड्युटी करताना नेमका काय फरक असतो, याबाबत या सैनिकानं नोंदवलेलं निरीक्षण आपल्याला विचार करायला लावणारं आहे.
कैलासनाथ हिरालाल कनोजिया… वय वर्षे २८. मूळ रहिवाशी वाराणसीचा. पण गेली १५ वर्षांपासून सिडकोतील भुजबळ फार्म परिसरात कुटुंबीय वास्तव्यास आहेत. सध्या छत्तीसगड येथे इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सच्या ४० बटालियनमध्ये तो कार्यरत आहे. २५ फेब्रुवारी रोजी तो महिनाभराच्या सुटीवर नाशिकला आला होता. सुटीचा कालावधी संपत असतानाच देशभरात कोरोनामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे कैलासनाथच्या सुटीतही वाढ झाली. कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्याची संधी त्यानिमित्तानं त्याला मिळाली. पण घरी बसेल तर हा सैनिक कसला?
संचारबंदीच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नका, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा असे शासन, प्रशासन ओरडून सांगत असताना जनता मात्र परिस्थितीचं गांभीर्य ओळखत नव्हती. ते चित्र पाहून व्यथित झालेल्या कैलासनाथने अंबड पोलीस स्टेशनमधील मित्र संजय जाधव यांना पोलिसांसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्याशी बोलून संमती मिळविली.
संचारबंदी जाहीर झाल्याच्या त्या दिवसापासून कैलासनाथ लष्करी वेशात अंबड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसोबत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ड्युटी करीत आहे. कैलासनाथ कधी पेट्रोलिंग करतोय. तर कधी नाकाबंदीत तपासणी. कैलासचा उत्साह, संवेदनशीलपणा आणि कर्त्यव्याची जाणीव पाहून पोलीस कर्मचारीही आवाक झालेत.
कैलासनाथच्या या अनोख्या देशसेवेबद्दल अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बेडवाल म्हणतात, ‘कैलास यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावण्यासाठी आमच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. आमच्याकडे असलेले संजय हवालदार यांचे ते मित्र आहेत. दररोज सकाळी न चुकता पोलीस स्टेशनला येतात. पेट्रोलिंग नाकाबंदीचे ते काम अचूक करतात. कमी काळात त्यांनी बरंच काही शिकून घेतलं आहे. त्यांचा उत्साह बघून आम्हाला हुरूप येतो. त्यांची इच्छाशक्ती बघून आमचे कर्मचारी अधिक जोमाने काम करतात. इतर असे कोणी असेल तर त्यांनी पोलीस दलाला मदत करावी.’
आपल्या या वेगळ्या कर्तव्याबाबत कैलासनाथ कनोजिया म्हणाले, ‘मागच्या महिन्यात सुट्टीवर आलो होतो. कोरोनामुळे मला माझ्या साहेबांनी सुट्टी वाढवून दिली. आमच्या जवळ राहणारे या पोलीस ठाण्यातील संजय साहेब आहेत. त्यांना मी याची माहिती दिली. मी ड्युटीवर येईन, अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनीही मला परवानगी दिली. मी आता नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वेगवेगळ्या भागात पेट्रोलिंग करतो. नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणी करतो. पोलिसांसोबत या काळात काम करतोय, याचा मला अभिमान आहे.’

अधिक वाचा  हेलिकॉप्टर ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा आला, दादांनी अनुभव सांगितला; फडणवीस म्हणाले…