मुंबई: राज्यातील करोना रुग्णांची संख्या जसजशी वाढत आहे, तसतसा आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. त्याबाबत रुग्णांच्या तक्रारीही सातत्यानं समोर येत आहेत. वरळीतील पोद्दार रुग्णालयांमधील असुविधांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वरळीचे आमदार व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या साऱ्याची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई केली आहे. तसंच, गैरसोयीबद्दल रुग्णांची माफीही मागितली आहे.
राज्यातील करोना रुग्णांची संख्या सध्या ७८१ वर पोहोचली आहे. त्यात अर्ध्याहून अधिक रुग्ण मुंबईतील आहे. साहजिकच त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात सामावून घेतलं जात आहे. वरळी, प्रभादेवी भागात अनेक करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत व अनेकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाइन करण्यात आलं आहे. वरळीतील पोद्दार रुग्णालयात बहुतेक रुग्णांची सोय करण्यात आली आहे. मात्र, रुग्णालयात त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचं समोर आलं आहे. याबाबतचे काही व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहेत. त्यात रुग्णालयातील बाथरूम, टॉयलेटची दुरावस्था दाखवण्यात आली आहे. जेवण व पिण्याच्या पाण्याची देखील चांगली सोय नसल्याची तक्रार रुग्ण करताना दिसत आहेत.
व्हिडिओच्या माध्यमातून रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात येताच आदित्य ठाकरे तात्काळ त्याची दखल घेतली व संबंधितांवर कारवाई केली. तसं ट्विट त्यांनी स्वत: केलं आहे. ‘ज्या रुग्णांची गैरसोय झाली होती, त्यांना इतरत्र हलवण्यात आलं आहे. मी स्वत: रुग्णांशी संपर्क साधून त्यांची माफी मागितली आहे. शिवाय गरज लागल्यास थेट संपर्क करता यावा म्हणून माझा संपर्क क्रमांकही दिला आहे,’ असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अधिक वाचा  पुणे हादरलं! पार्किंगचा वाद महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद