नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संपूर्ण देशाने प्रतिसाद देत दिवे, फ्लॅश लाइट आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशाने भारत उजळून निघाला. नागरिकांना ९ वाजता घरातील लाइट बंद करून दिवे आणि मेणबत्त्या पेटवून करोनाविरोधातील लढाईत पाठिंबा दिला. काही ठिकाणी भारता माता की जय… गो करोना गो… अशा घोषणाही देण्यात आल्या. तर काही ठिकाणी अतिउत्साही नागरिकांनी फटाकेही फोडल्याचं समोर आलं.
करोना विरोधातील लढाईत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यासह, लष्करातील जवान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, उद्योगपती आणि कलाकारही सहभागी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह केंद्रीय मंत्री मंडळातील इतर मंत्र्यांनी दिवे लावत आपला सहभाग नोंदवला.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अहमदनगर, अमरावती, औरंगाबादसह ग्रामीण भागातील नागरिकांनीही घरातील लाइट बंद करून नागरिकांनी दिवे आणि मेणबत्त्या लावल्या. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाब, कर्नाटक, तेलंगण आणि कर्नाटकमध्येही नागरिकांनीही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही यात सहभाग घेत जनतेत करोनाविरोधी लढाईत जनजागृतीचा प्रयत्न केला.अक्षय कुमार, क्रिती सेनॉन, अर्जुन रामपाल, रवीना टंडन यांच्यासह अनेक कलाकरांनी दिवे लावत मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही आपल्या अँटिलिया इमारतीचे संपूर्ण दिवे बंद करत टेरिसवर मेणबत्ती पेटवून करोनाविरोधी लढाईत आपला सहभाग नोंदवला.