सिडनी : सध्याच्या घडीला जगात कोरोनाशिवाय दुसरं काही नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जगातील तब्बल 206 देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या देशांमध्ये मिळून कोरोनामुळे मृतांचा संख्या 60 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. मृत्यूचं प्रमाण जास्त असण्याचं कारण म्हणजे यावर अद्याप कोणतीच लस किंवा उपचार नाही. जगात याच्या उपचारावर आणि लसीवर संशोधन सुरू आहे. यात एक आशेचा किरण सापडला आहे. ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक यावर औषध शोधण्याचा जवळ पोहोचले आहेत.
ऑस्ट्रेलियात वैज्ञानिकांनी लॅबमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या पेशीमधून धोकादायक व्हायरसला 48 तासांमध्ये संपवलं आहे. तेसुद्धा अशा औषधापासून जे पहिल्यापासून उपलब्ध आहे. संशोधकांना असं आढळून आलं की, जगात पहिल्यापासूनच असं एक अँटिपॅरासाइट ड्रग आहे ज्याने कोरोना व्हायरस संपवला. कोरोना व्हायरसवर उपचाराच्या दिशेनं पडलेलं हे पहिलं यशस्वी पाऊल ठरणार आहे. याची वैद्यकीय चाचणी अद्याप बाकी असल्याचं संशोधकांनी सांगितलं.
अँटि व्हायरल रिसर्च जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इवरमेक्टिन नावाच्या औषधाचा फक्त एक डोस कोरोनासह सर्व व्हायरल आरएनएला 48 तासात संपवू शकतो. जर संसर्ग जास्त नसेल तर व्हायरस 24 तासांच्या आतही संपुष्टात येऊ शकतो. आरएनए व्हायरस त्या व्हायरसला म्हटलं जातं ज्यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये आरएनए असतं. आरएनए म्हणजे रिबो न्यूक्लिक अॅसिड. हे संशोधन ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटीच्या कायली वॅगस्टाफ यांच्यासह इतर वैज्ञानिकांनी केलं आहे.
वैज्ञानिकांनी म्हटलं की, इवरमेक्टिन एक असं अँटि पॅरासाइट ड्रग आहे जे एचआयव्ही, डेंग्यू, इन्फ्लुएन्झा, जीका व्हायरस सारख्या अनेक व्हायरसवर प्रभावी ठरलं आहे. मात्र हे संशोधन लॅबमध्ये झालं असून याची लोकांवर चाचणी करण्याची गरज आहे असं मतही त्यांनी नोंदवलं. इवरमेक्टिनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि हे सुरक्षित औषधही मानलं जातं. आता त्याच्या डोस कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीवर कितपत यशस्वी ठरतो ते तपासण्याची गरज आहे. हा संशोधनाचा पुढचा टप्पा असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. सध्या जगात कोरोनाशी लढा देण्यासाठी यावर संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप अधिकृत औषध किंवा उपचार नाही. जर आपल्याकडं आधीपासून उपलब्ध असलेल्या औषधांचे मिश्रण असेल तर त्याची लोकांना मदत होईल असंही संशोधकांनी सांगितलं आहे.
अद्याप इवरमेक्टिन कोरोना व्हायरसवर कितपत मात करेल याची चाचणी झालेली नाही. पण संशोधकांचं म्हणणं आहे की, हे जसं इतर व्हायरसला संपवतं तसंच कोरोनावरही संपवेल. या औषधामुळे सुरुवातील ज्या पेशींमध्ये संसर्ग झाला त्यातील व्हायरसचा प्रभाव कमी करण्याचं काम केलं जातं. संशोधकांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसवर या संभाव्य औषधाची आम्हाला उत्सुकता आहे. मात्र प्री क्लिनिकल टेस्टिंग आणि त्यानंतर क्लिनिकल ट्रायल होणे बाकी आहे. यानंतरच कोरोनावर उपचारासाठी इवरमेक्टिनचा वापर करायला हवा. त्याआधी करणं धोक्याचं ठरू शकतं असा इशाराही संशोधकांनी दिला.