कोकणातील चाकरमानीदेखील रेल्वे रुळांवरून पायी चालत कोकणातील आपल्या गावाकडे जावू लागले आहेत. अशाच दहा जणांना शुक्रवारी महाड तालुक्यातील करंजाडी रेल्वे स्थानकात पकडण्यात आले. त्यांची चौकशी आणि तपासणी करून त्यांना पुढे रवाना करण्यात आले. सुमारे २०० चाकरमानी पनवेलपासून रेल्वे रुळांवरून चालत कोकणातील आपल्या गावाकडे निघाल्याची माहिती या दहा जणांनी दिली. करंजाडी रेल्वे स्थानकात मुंबईतून पायी चालत निघालेली एक तरुणी आणि नऊ तरुण करंजाडी रेल्वे स्थानकात थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाड तालुका पोलीसांनी त्यांची चौकशी केली.
मुंबईतील दिवा, शिवडी, दादर अशा विविध भागांत राहणारे हे तरुण ३० मार्च रोजी पनवेल येथे पोहोचले. मात्र पनवेल येथून त्यांना पुढे वाहन नेण्यास परवानगी नाकारण्यात आल्यानंतर, त्यांनी पनवेल रेल्वे स्थानकातून आपल्या गावाकडे रेल्वे रुळांवरून चालत जाण्याचा निर्णय घेतला. रात्री रेल्वे स्थानकात थांबायचे, दुपारी थोडी विश्रांती घ्यायची आणि सायंकाळपर्यंत जवळचे रेल्वे स्थानक गाठून तेथे विश्रांती घ्यायची, मोबाइल चार्ज करायचे आणि सकाळी पुन्हा मार्गस्थ व्हायचे असा त्यांचा दिनक्रम आहे.

अधिक वाचा  या देशात याकूब मेमनच्या दफनासाठी जागा मिळते, पण अक्षयला… आरोपीच्या वकिलाची खदखद काय?