मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री घराची बाल्कनी आणि खिडकीत दिवे किंवा मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या. पण कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये आणि गर्दीही करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसंच राज्यसमोर आजच्या घडीला करोनावर मात करणं आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दारात, खिडक्यात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत असताना राज्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्तावर उतरून गर्दी करणं टाळावं. सध्या सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात, अशा वेळी दिव्याजवळ हात नेल्यास अपघात होऊ शकतो. त्याबाबतही सावध राहण्याची सूचना अजित पवार यांनी केली आहे. राज्यात आरोग्य, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेनं काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
राज्यातील करोना रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणं, दररोज वाढणारे मृत्यू रोखणं, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणं, टाळेबंदीनं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हानं आहेत. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. करोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं हे आता तुमचं कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर, करोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचा  दक्षिणी अहमदी प्रांत आगीत होरपळून 40 भारतीयांचा मृत्यू; मंगाफ येथे सहा मजली इमारतीला भीषण आग