लंडन: ब्रिटनमध्ये करोनाचा कहर सुरू आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असून मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी, ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ७०८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, करोनाबाधितांची संख्या ही ४० हजारांहून अधिक झाली आहे.
ब्रिटनमध्ये करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ८३ हजारजणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४१ हजार हजार ९०३ जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. करोनाच्या आजाराने चार हजार ३१३ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी, ७०८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, शुक्रवारी ३ एप्रिल रोजी ६८४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये खबरदारीचे विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
तर, दुसरीकडे लंडनमध्ये चार हजार खाटांची सुविधा दहा दिवसांच्या आत उभी करण्यात आली आहे. शुक्रवारी ती सर्वांसाठी खुली झाली. तर, एक हजार ५०० रुग्णांसाठी पश्चिमेस ब्रिस्टल आणि उत्तरेकडील हॅरोगेट येथे दोन सुविधा नव्याने केल्या जात असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य सेवेने (एनएचएस) एका निवेदनात दिली आहे. पुढील काळात बर्मिंगहॅम आणि मँचेस्टर येथेही अशी रुग्णालये सुरू होत असून, तेथे तीन हजार खाटांची सोय असेल, असे ‘एनएचएस’च्या निवेदनात नमूद केले आहे.

अधिक वाचा  आमदार प्रवीण स्वामींच्या जात प्रमाणपत्रास आव्हान; खंडपीठाकडून मंगळवारी नोटीस पाठवल्या