‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ‘लॉकडाउन’ लागू करण्यात आल्यानंतर अनेक बेघर रस्त्यावर आले आहेत. त्यांना कोठेही आसरा मिळत नसल्याने बेघरांची काळजी घेण्यासाठी महापालिका पुढे सरसावली आहे. येरवडा आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने दीडशे बेघरांना पालिकेच्या शाळांत निवाऱ्याची सोय केली आहे. सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
‘येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने आळंदी रस्त्यावरील नानासाहेब परुळेकर शाळेत ५५, येरवडा येथील कर्नल यंग शाळेत ४८ आणि मदर तेरेसा इमारतीत १६ बेघरांची सोय केली आहे,’ असे सहायक आयुक्त विजय लांडगे यांनी सांगितले. ‘नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने वडगाव शेरीतील आनंदऋषी शाळेत २४ लोकांच्या निवाऱ्याची सोय केली आहे. पालिकेकडून बेघरांच्या निवाऱ्यासोबत स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे,’ अशी माहिती सहायक आयुक्त राजेश बनकर यांनी दिली. काही सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून या बेघरांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

अधिक वाचा  जैन मंदीरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त दंत व डोळे तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद