करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणारच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोविडपासून महाराष्ट्राला वाचवणारच. मात्र दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.
खोटे आणि उगाचच अफवा पसरवणारे दोन समाजांमध्ये दुहीचा व्हायरस पसरवणारे व्हिडीओ कुणी गंमत म्हणूनही पसरवत असेल तर त्यापैकी कुणाचीही गय केली जाणार नाही. नोटांना थुंकी लावण्याचा व्हिडीओ किंवा इतर त्यासारखे व्हिडीओ पसरवले जात आहेत. ज्यामुळे दोन समजांमध्ये तेढ निर्माण होते. असं गंमत म्हणूनही कुणी करत असेल तरीही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
..होय रुग्ण वाढत आहेत
महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे. जगभर धुमाकूळ या व्हायरसने घातला आहे. या केसेसमध्ये आपण रुग्ण चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ही संख्या वाढते आहे. काळजी करु नका कारण ५१ लोकांना घरी पाठवण्यात आलं आहे हेदेखील लक्षात घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
सगळेजण जात-पात-धर्म-पंथ विसरुन करोनाशी लढा देण्यासाठी एकत्र आले आहेत. अनेक संस्था जेवणाचं वाटप करत आहेत. अनेक हॉटेल्सनी मदतीचा पुढाकार घेतला आहे. सिंहाचा नाही तर खारीचा वाटा सगळेजण उचलत आहेत. मी या सगळ्यांना धन्यवाद देतो आहे. धन्यवाद, विनंती हे सगळे शब्द संयम पाळणाऱ्या सगळ्यांसाठी आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला.
सोलापुराच्या आराध्यचं कौतुक
सोलापुरच्या आराध्याचं विशेष कौतुक करणार आहे. सगळेजण लॉकडाउनच्या काळात संयम दाखवत आहेत. आराध्याने वेगळा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे. आज तिचा वाढदिवस आहे. तिने वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. सात वर्षांच्या मुलीमध्ये ही समज आली असेल तर आपण हे युद्ध जिंकलंच समजाच. काल रात्री सिंगापूरच्या पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. आपण ज्या गोष्टी महाराष्ट्रात, देशात केल्या त्याच सिंगापूरच्या पंतप्रधानांनी केल्या. व्हायरसच्या विरोधात लढाईसाठी सगळे एकवटले आहेत.
किराणा, भाजी घेण्यासाठी गर्दी नको
किराणाची दुकानं, भाजी बाजार आम्ही २४ तास सुरु ठेवली आहेत. तिथे जाऊन गर्दी करु नका. करोनासमोर गुडघे टेकू नका. त्याला आपल्याला हरवायचं आहेच हे लक्षात घ्या. संयम पाळलात तर आपण त्याला हरवू शकतो. त्यामुळे भाजी घ्यायला जाताना, किराणा घ्यायला जाताना गर्दी करु नका असं आवाहन मी हात जोडून आपल्याला करतो आहे. तसंच करोनाला हरवायचं असेल तर स्वयंशिस्त आणि संयम महत्त्वाचा आहे हे विसरु नका असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘वर्क फ्रॉम होम’ शक्य असणाऱ्यांनी घर सोडू नका
ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे त्यांनी अजिबात घर सोडू नका. त्यांनी घरुनच काम करा अशीही विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. इतकंच नाही तर संयम पाळणं खूप आवश्यक आहे. या संयमानेत आपल्याला करोनाशी लढा द्यायचा आहे आणि या व्हायरसला हरवायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  शरद पवारांना मोठा दिलासा! आत्ता चिन्हांची चिंता संपली; विधानसभेपूर्वी निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय