दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. दिवे लावायला सांगण्याऐवजी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं असतं, आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत, याचा माहिती दिली असती तर बरं झालं असतं, असंही त्यांनी नमूद केलं. राज ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकंदरीत परिस्थितीवर भाष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना रविवारी सर्वांना दिवे लावायला सांगितले. नाहीतरी आपण घरात बसून काय करणार असं म्हणत लोकं त्यांचं ऐकतीलही. हे सर्व सांगण्याऐवजी त्यांनी आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत. उद्या काय घडणार याबाबत माहिती दिली असती तर लोकांना बरं वाटलं असतं. सध्या देशात जी संभ्रमावस्था आहे ती पदावर बसलेल्या लोकांनी दूर केली पाहिजे. आज ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना काही समजत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वांना लॉकडाउन गांभीर्यानं घेण्याची विनंती केली.
सध्या प्रत्येक घरात एक डॉक्टर
सध्या प्रत्येक घरात एक डॉक्टर निर्माण झाला आहे. कोणी म्हणतं गोमुत्र प्या, कोणी म्हणतं हे खा, ते खा. पण दुसरीकडे पोलीस कर्मचारी, डॉक्टर, सफाई कामगार, शेतकरी हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.परंतु लोकांना गंभीर्य येत नाही, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
लॉकडाउन वाढल्यास मोठं आर्थिक संकट
सर्वांनी लॉकडाउन गांभीर्यानं घ्यावा. आज लोकांसमोर अनेक प्रश्न आहेत. पण जीवनावश्यक वस्तू सरकार उपलब्ध करून देत आहे. लॉकडाउनचे दिवस वाढवले गेले तर त्याच्या होणाऱ्या परिणामांची अधिक भीती आहे. उद्योगधद्यांची मोठी भीती वाटत आहे. अनेकांनी कामगारांच्या वेतनातही कपात केली आहे. लॉकडाउन पुढेही सुरू राहिल्यास परिस्थिती कठिण होईल आणि मोठं आर्थिक संकट निर्माण होईल, असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  विधान परिषद निवडणुकीआधी पुन्हा सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, पडद्यामागे काय घडतंय?