राज्यावर करोनाचे संकट अधिकच गडद होत असताना उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या माध्यमांतून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. आजाराला तोंड देण्यासाठी पुरेशा प्रमाणात ‘व्हेंटिलेटर’ची व्यवस्था करण्यात येत असून खासगी रुग्णालयांशी या संदर्भात करार करण्यात आला आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक परिषदेतून परत आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शुक्रवारी नाशिक शहरात सहा करोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची अफवा पसरल्याने आरोग्य विभागासह पोलिसांची धावपळ उडाली.
करोना संशयितांची संख्या वाढत आहे. धाप लागणे, अचानक ताप येणे अशा रुग्णांनाही रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात येत आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात तीन, मालेगाव येथील सामान्य रुग्णालय, महापालिकेचे डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय येथे सहा रुग्ण दाखल आहेत. तसेच जिल्ह्य़ातील नऊ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, शुक्रवारी नाशिकमध्ये सहा रुग्णांचे अहवाल सकारात्मक आल्याची अफवा समाजमाध्यमात पसरली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्य़ात नवीन कोणत्याही रुग्णाचा अहवाल सकारात्मक आलेला नसल्याचे सांगितले. जिल्ह्य़ातील एकमेव करोना रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक परिषदेहून परतलेल्या नागरिकांचा उत्तर महाराष्ट्रात शोध सुरू आहे. जळगावच्या पिंप्राळा परिसरातील मशिदीजवळ एका खोलीत वास्तव्यास असलेल्या दोघांना रामानंदनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. रत्नागिरी येथील रहिवासी असलेले हे दोघे संशयित निजामुद्दीन येथील कार्यक्रमाला गेले होते. निजामुद्दीनहून परतल्यानंतर दोघेही पिंप्राळा परिसरातील खोलीत राहत होते. संशयितांनी आपली माहिती लपवून ठेवली होती. रामानंदनगर ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना ही माहिती मिळाल्यानंतर संशयितांना ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, धुळे जिल्ह्य़ात १५ हजार नागरिकांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले असून आतापर्यंत ७५ रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.
करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास व्हेंटिलेटरचा तुटवडा भासू नये, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात २० व्हेंटिलेटर असून वरिष्ठ पातळीवर जादा व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत खासगी रुग्णालयांशी करार झाला असून गरज पडल्यास त्यांची मदत घेण्यात येणार आहे.

अधिक वाचा  चँपियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या घोषणेला उशीर, BCCI आता ICC कडे कोणती मागणी करणार ?