नवी दिल्ली: संपूर्ण देश करोना व्हायरसविरुद्ध लढत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या लढ्यात सर्वांना योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारांना मदत करत आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी आर्थिक मदत केली आहे. यात बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, कुस्तीपटू बजरंग पुनिया, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली, रोहित शर्मा, सुरेश रैना आदींचा समावेश आहे. पण भारतीय क्रिकेटमधील असे काही श्रीमंत खेळाडू आहेत त्यांनी अद्याप करोनाविरुद्धच्या लढात कोणताही मदत केलेली नाही. देशात लॉकडाऊन जाहीर होऊन १० दिवस झाले आहेत. ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांना मदत करण्यासाठी अद्याप हे अति श्रीमंत क्रिकेटपटू का समोर नाहीत, असा प्रश्न सोशल मीडियातून अनेक जण विचारत आहेत.
संपूर्ण देशावर मोठे संकट आले असताना अनेकांनी मोठ्या मनाने दान दिले आहे. टाटा समूहाने तर १ हजार ५०० कोटी तर अझीम प्रेमजी यांनी १ हजार १२५ कोटीची मदत दिली आहे. सचिन तेंडुलकरने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी २५ कोटींची मदत केली आहे. या मदतीचे सर्वजण कौतुक करत आहेत. पण असे काही क्रिकेटपटू आहेत जे श्रीमंत असून अद्याप त्यांनी काहीच मदत केली नाही. तशी मदत न करणाऱ्यांची यादी फार मोठी आहे पण त्यातील काही महत्त्वाच्या खेळाडूंवर एक नजर…
महेंद्र सिंह धोनी- काही दिवसांपूर्वी धोनीने पुण्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या एका संस्थेला १ लाख रुपयांची मदत केल्याचे वृत्त आले होते. धोनीची पत्नी साक्षीने ही माहिती दिली होती. तेव्हा काहींनी धोनीला ट्रोल देखील केले होते. पण संबंधित संस्थेला १ लाख कमी पडत होते तेव्हा ती कमी पडणारी रक्कम धोनीने दिल्याचे समोर आले होते. पण असे असेल तरी धोनीने त्यानंतर कोणतीही मदत केली नाही. धोनीचा आयपीएलमधील सहकारी सुरेश रैनाने ५२ लाखांची मदत केली आहे. पण जवळपास ८०० कोटींची संपत्ती असणाऱ्या आणि कर्णधारपद सोडल्यानंतर देखील वर्षाला ८० कोटी कमवणाऱ्या धोनीने अद्याप मदत का केली नाही, असा प्रश्न अनेक जण सोशल मीडियावरून विचारला जात आहे.
रविंद्र जडेजा- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आदर्श माननाऱ्या सर रविंद्र जडेजाने अद्याप कोणतीही मदत कोरानाग्रस्तांसाठी दिलेली नाही. मैदानात अर्थशतक केल्यानंतर हटके अंदाजमध्ये तलवार चालवणाऱ्या जडेजाची स्टाइल सर्वांना माहीत आहे. जडेजाच्या संघातील अनेक सहकाऱ्यांनी मदत केली असताना तो अद्याप मागे आहे.
अन्य खेळाडू- करोनासाठी मदत न करणाऱ्या स्टार खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादव सारख्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. ही सर्व जण सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. पण पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर मात्र या खेळाडूंनी कोणताही उत्साह दाखवला नाही. बुमराह बीसीसीआयच्या ‘ए प्लस’ करारात आहे. या करारानुसार त्याला वर्षाला ७ कोटी मिळतात.
प्रशिक्षक रवी शास्त्री- भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वर्षाला १५ कोटी इतके मानधन दिले जाते. पण त्यांनी देखील करोनाग्रस्तांसाठी मदत देण्यास अद्याप मोठे मन दाखवले नाही.
माजी खेळाडूंचा समावेश
भारतीय संघाकडून खेळलेले काही माजी खेळाडू आहेत जे सध्या क्रिकेट संदर्भातील अन्य ठिकाणी सक्रीय आहेत. यात कपील देवसह अन्य खेळाडूंचा समावेश आहे. पण हे कोणीही खेळाडू मदत देण्यास पुढे आलेले नाहीत. कपील देव यांचा अनेक वृत्तवाहिन्यांशी करार आहेत आणि ते कोट्यवधी रुपये कमवतात. माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन देखील या काळात अचानक गायब झाला आहे. याशिवाय अनेक असे खेळाडू आहेत जे निवृत्तीनंतर मोठी कमाई करत आहेत. पण मदत देण्यास मात्र मागे आहेत.
फक्त क्रिकेटपटूच नाही तर सिने कलाकारांबाबत देखील सोशल मीडियावर हीच चर्चा सुरू आहे. करोना सारख्या संकटावेळी तर किमान कोट्यवधींची कमाई करणाऱ्यांनी थोडी मदत करावी असे मत अनेक जण व्यक्त करत आहेत.