औरंगाबाद : एकेकाळी शिवसेनाप्रुमख बाळासाहेब ठाकरे, प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या घरी काम करणाऱ्या आणि आता एकाकी जीवन जगणाऱ्या द्वारकामाईंचे लॉकडाऊनमध्ये हाल सुरू आहे. नाथप्रांगणातील नागरिकांनी त्यांना मदतीचा आधार देत त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची भ्रांत तूर्तास मिटवली आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या असंख्य गोरगरीबांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी नाथप्रांगणमधील नागरिक एकत्र आले. त्यांनी पैसे गोळा करून किमान रोज पाचशे गरजूंना घरपोच जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला. या कार्यकर्त्यांसोबत शुक्रवारी नाथप्रांगणचे रहिवासी तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ, मनीष महाजन यांना फिरण्याचा योग आला. जंजाळ यांच्या एका रुग्णवाहिकेत इस्कॉनच्या अन्नामृतमधून खिचडी भरून आणलेले पाचशे डबे, तेवढ्याच पाण्याच्या बाटल्या ठेवल्या. रुग्णवाहिकेत महाजन व कार्यकर्ते तर, जंजाळांनी स्वत:ची दुसरी गाडी घेत या साऱ्यांना आपल्या संपर्क कार्यालयात बोलावले आणि आपली गाडी शिवाजीनगरातील एका गल्लीत वळवली.
अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी सिडकोने ही वसाहत बांधली. त्यामुळे घरांचा आकार देखील लहान. गल्लीच्या टोकाला असणाऱ्या घरासमोर जंजाळ यांनी गाडी थांबवली. दार वाजवून आवाज दिला. घरातून एक वृद्धा बाहेर आली. जंजाळ यांनी त्या महिलेच्या हाती खिचडीने भरलेले दोन डबे ठेवले. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तिने सुरुवातीला आढेवेढे घेतले. नाव विचारले असता सांगितले नाही. तेव्हा जंजाळ यांना त्यांच्या घराच्या दारावर द्वारकाबाई जाधव असे लिहिलेले दिसले. त्यांनी तुम्ही यापूर्वी कुठे होतात, इथे केव्हा आलात असे विचारले. त्यानंतर त्यांनी बोलणे सुरू केले. ‘१९७२च्या काळात मी कुटुंबासह मुंबईत होते. कलानगरमध्ये बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर यांच्या घरी भांडीकुंडी केली. त्यानंतर पती औरंगाबादला आले. त्यांच्याबरोबर इथे आले. आता पती, मुले सोबत रहात नाहीत. भोकरदन तालुक्यातील राजूरजवळ केदारखेडा हे आमचे गाव. मला इथे सोडून नवरा तिथे निघून गेला. आता इथलीच पोरं माझा सांभाळ करतात. सरकारने घराबाहेर पडू नका असे सांगितले. त्यामुळे हाताचे काम बंद झाले. पोरं रोज घरी डबा आणून देतात. त्यामुळे पोटाची आग विझते,’ अशी व्यथा मांडली. तेव्हा जंजाळही क्षणभर स्तब्ध झाले.