नवी दिल्ली : दिल्लीच्या निझामुद्दीन भागात ‘तबलीघी जमात’च्या कार्यक्रमात जवळपास ३००० हून अधिक जण सहभागी झाले होते. ‘मरकझ’मधून बाहेर काढण्यात आलेल्या २३४६ जणांपैंकी १०८ जणांमध्ये करोना विषाणूचं संक्रमण आढळल्याचीही माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलीय. याच दरम्यान पोलिसांनी जमातच्या या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या लोकांना नोटिस धाडण्याचं काम सुरू केलंय. ‘लॉकडाऊन’ उल्लंघन करून अनेकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. मुस्लीम धर्मगुरू मौलाना साद कांधलवी यांनाही पोलिसांनी नोटीस धाडलीय. परंतु, मौलाना साद मात्र सध्या फरार आहेत. मौलाना साद हेदेखील करोना संक्रमित असू शकतील, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.
कुठे आहेत मौलाना साद?
मौलाना साद यांचा शोध घेत पोलिसांची एक टीम त्यांच्या घरी दाखल झाली. यावेळी मौलाना साद यांचे कुटुंबीय पोलिसांना सामोरे गेले. मौलाना साद यांना पोलिसांसमोर हजर व्हावं लागेल, असं पोलिसांनी कुटुंबीयांना सांगितलं. यावेळी, साद यांचे वकील पोलिसांना भेटतील असं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. यावेळी, पोलिसांनी मौलाना साद हेदेखील करोना संक्रमित असू शकतील. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर समोर यायला हवं, असं आवाहन केलंय.
‘डॉक्टरांकडे जाणं हे शरियतविरुद्ध नाही’
नुकत्याच समोर आलेल्या एका ऑडिओत ‘दिल्लीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपण आयसोलेशनमध्ये असल्याचं’ मौलाना साद यांनी म्हटलं होतं. सोबतच, डॉक्टरांकडे जाणं हे शरियतविरुद्ध नाही… जमातच्या कार्यकर्त्यांनी सरकारला पूर्ण मदत करायला हवी आणि डॉक्टरांचा सल्लाही घ्यायला हवा… तसंच यापुढे कुठेही ‘मजमा’ लावण्यात येऊ नये, असं आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं.
तबलीघी जमातचा ‘आत्मघातकी’ कार्यक्रम
दिल्ली पोलिसांना २१ मार्च रोजी तबलीघी जमातच्या या कार्यक्रमाची माहिती मिळाली होती. म्हणजे, देशव्यापी लॉकडाऊन सुरू होण्याच्या अगोदर दोन दिवस… दिल्ली पोलिसांनी मौलाना साद कांधलवी यांच्यासोबत इतर ६ जमांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ते ३० मार्च दरम्यान मरकजमध्ये १३०० लोक एकत्र जमले होते. कुणीही मास्कचा वापर केला नव्हता तसंच कुणीही सॅनिटायझरचाही वापर केला नाही. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून क्राईम ब्रान्चनं ५० टीम तयार केल्या. त्यानंतर २० रुग्णालयांमध्ये जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांना दाखल करण्यात आलं. ते पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘तबलीघी जमात’च्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या ९६० परदेशी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलाय. जमातमध्ये सहभागी झालेले आणि या लोकांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ९००० लोक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलंय.

अधिक वाचा  ‘लोकांनी आमची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहुद्या’, विजय शिवतारे आणि अजित पवार यांचं मंचावर मनोमिलन