नगर: संगमनेरमध्ये चार जणांना करोनाची लागण झाल्याचं उघड झालेलं असतानाच लॉकडाऊन असतानाही नेपाळमधील तबलीग जमातीच्या १४ जणांना संगमेनरातील मशिदीत आणि नंतर घरी वास्तव्यास ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मोमीनपुरा येथील पाच जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
हाजी जलीमखान कासामखान पठाण, हाजी शेख जियाऊद्दीन आमीन, जैनुद्दीन हुसेन परावे, हाजी इमाम जैनुद्दिन मोमीन, रिजवान गुलामनवी शेख (सर्व रा. मोमीनपुरा, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी नावे आहेत. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी (२एप्रिल) रात्री उशिरा पोलीस नाईक सलीम रमजान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी नेपाळमधील तबलीग जमातीच्या १४ जणांना शहरातील एका मशिदीत व नंतर रहेमतनगर गल्ली क्रमांक दोन येथे वास्तव्यास ठेवले. या १४ जणांना पोलिसांनी ताब्यात रात्री उशिरा ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी सांगितले.
दरम्यान संगमनेर शहरातील नायकवाडपुरा, लखमीपुरा, बागवानपुरा व ग्रामीण भागातील आश्वी बुद्रुक, हिवरगाव पावसा या भागातील १५ जणांना सोमवारी प्रशासनानेताब्यात घेतले होते. यातील नायकवाडपुरा येथील तिघांना तर आश्वी बुद्रुक येथील एकाला असे चौघांजणांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. संगमनेरात एकीकडे कोरोनाचं संकट घोंगावत असताना हे नेपाळमधील तबलीग जमातीचे १४ जन शहरामधील मशिदीत व का लपून राहिले होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
करोनाबाधिताचा रिपोर्ट निगेटिव्ह
दरम्यान, नगरमध्ये आढळलेल्या दुसऱ्या करोनाबाधिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. १४ दिवस त्याला क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्याची आणखी एक चाचणी करण्यात आली आहे. हा रिपोर्टही निगेटिव्ह आल्यास त्याला घरी सोडण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्यातील करोनाबाधितांची संख्या ४१६ वर गेली आहे. कालच्या एका दिवसात राज्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत १९ मृत्यू झाले आहेत. करोनाचे रुग्ण बरे होत असले तरी संसर्गाच्या तुलनेत त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे.

अधिक वाचा  दहा दिवसांवर आषाढी एकादशी विठुरायाचे आता २४ तास दर्शन; २६ जुलैपर्यंत मंदिर राहणार खुले