मुंबई: ‘मुसलमान समाजात जागरूकता होत आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत आहे. त्याच वेळेला ‘मरकज’सारखे काही घडवून त्यावर पाणी पडते. दिल्लीतील ‘मरकज’ने हिंदू-मुसलमान असा खेळ करणाऱ्यांना आयतेच कोलीत दिले आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेनं ‘मरकज’चं आयोजन करणाऱ्यांवर टीका केली आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश घरात बसला असताना दिल्लीच्या निजामुद्दीन येथे जमलेल्या मुस्लिमांमुळं अनेक ठिकाणी संसर्ग पसरला आहे. त्यामुळं चिंतेत भर टाकली आहे. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’तून या प्रकारावर भाष्य करताना देशातील अज्ञानी मुस्लिमांवर टीकेची तोफ डागण्यात आलीय. ‘येथील अज्ञानी मुसलमानांनी ‘मक्का-मदिने’कडून तरी काही शहाणपण घ्यायला हवं. तिथंही करोनामुळं ‘लॉक डाऊन’ आहे. मग इथंच ‘मरकज’च्या झुंडी जमा का करता? अशानं इस्लाम खरंच खतऱ्यात येईल, असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.
निजामुद्दीन परिसरात जमलेल्या धार्मिक झुंडीने देशाला ३८० कोरोनाग्रस्तांचा ‘नजराणा’ पेश केला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे अक्षम्य बेफिकीरी व धर्मांध मस्तवालपणाचा नमुना आहे. ‘मरकज’निमित्ताने जे लोक तेथे जमले त्यांनी राष्ट्राची व समाजाची अशी काय सेवा केली? किंबहुना नुकसानच केले.
एका बाजूला देशातील सर्वच धार्मिक स्थळे गर्दी टाळण्यासाठी बंद केली असताना ‘इस्लाम’च्या नावाखाली इतके लोक जमणे हे अमानुष आहे. दुबई, कुवैत, बहरीन, सौदी अरब अशा देशांमध्येही मशिदी बंद आहेत. तेदेखील मुसलमानच आहेत आणि इस्लामचे बंदे आहेत. पण तिथं कुणी ‘इस्लाम’ संकटात आल्याची बांग ठोकलेली नाही, पण दिल्लीत ‘मरकज’ची यात्रा घडली नसती तर धर्मावर काय मोठे आकाश कोसळले असते?
महाराष्ट्रात निजामुद्दीनची पुनरावृत्ती नको: शरद पवार
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच पोलिसांनी शाहीन बाग परिसर रिकामा केला. तसाच बळाचा वापर करून हे ‘मरकज’ही रोखता आले असते. हा प्रश्न धार्मिक नसून राष्ट्राच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा आहे आणि मुसलमान समाजातील लोकही या कारवाईच्या मागे ठामपणे उभे राहिले असते.
कोरोनासारखा गंभीर आजार ‘धर्म’ पाहून येत नाही. गरीब-श्रीमंत असा भेद हा आजार करीत नाही. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, गर्दी टाळा. घरी थांबण्यातच तुमचे हीत आहे. जे ‘मरकज’ला गेले त्यांनी स्वत:हूनच पुढे यायला हवे. त्यात लपविण्यासारखे काय आहे? जे हे लपवतात, ते देशाला फसवतात. हिंदुस्थानातील धर्मांध मुसलमानांच्या या प्रवृत्तीमुळेच येथे अनेकदा संघर्षाच्या ठिणग्या पडतात. त्यांच्याशी कठोरपणे वागावे तर त्यांना येथे असुरक्षित असल्याची भावना उफाळून येते आणि प्रेमाने वागावे तर ‘मरकज’सारखी प्रकरणे घडतात.

अधिक वाचा  चोरीसाठी वाईन शॉपमध्ये नोकरीला लागला, अन् लाखोंच्या दारूवर केला हाथ साफ