मुंबई : कोरोच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशवासीयांकडे 9 मिनिटांचा वेळ मागितला आणि 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचं आवाहन केलं. मात्र याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड पंतप्रधान मोदींवर संतापले आहेत.
‘भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन, नक्की काय म्हणाले?
भारताने दाखवलेलं धैर्य अनेक देशांसाठी आदर्श आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी मोठं सहाकार्य केलं. हा सरकार आणि लोकांचा सामूहिक लढा आहे. तुम्ही कोणीही एकटे नसून आपण सगळे एकत्र आहोत. जनतेने 22 मार्चला जनता कर्फ्यूचं पालन केलं. त्यासाठीही मोदींनी पुन्हा एकदा जनतेचे आभार मानले आहेत.
‘5 एप्रिलला सगळ्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र यायचं आहे. 130 करोड देशवासियांच्या शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे. मला रात्री 9 वाजता सगळ्यांचे 9 मिनिट हवं आहेत. यावेळी आपण घरातील सगळ्या लाईट बंद करू आणि सगळे घराच्या दारात उभे राहून मेनबत्ती, दिवा, मोबाईलची लाईट लावू. या वेळी घरातील सर्व लाईट बंद असतील. तेव्हा प्रकाशाच्या या महाशक्तीचा जागर होईल आणि सगळ्यांची एकता दिसेल’ असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे.