बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. एका कनिष्ठ महाविद्यालयात पेशाने प्राचार्य असलेल्या बापाने पोटच्या दोन मुलींवर बलात्कार, तर तिसऱ्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार मुलींनी आई आणि नातेवाईकांना सांगितला. मात्र, गप्प बसा नाहीतर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी नातेवाईकांनी या मुलींना दिली. त्याचबरोबर मारहाणही केली. या एका मैत्रिणीकडे या प्रकरणाची वाच्यता केल्यानंतर हादरवून टाकणारी ही प्रकाशात आली. या प्रकरणी नराधम बापाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राचार्य असलेला आरोपी आपल्या तिन्ही मुलींबरोबर सतत अत्याचार करत होता. या सर्व प्रकार तिन्ही मुलींनी आपल्या आईला तसेच नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी मुलींची बाजू घेण्याऐवजी आरोपीला पाठिशी घातले. त्याचबरोबर गप्प बसा नाहीतर तुम्हालाच मारून टाकू, अशी धमकी देत पीडित मुलींना बेदम मारहाणही केली. या प्रकरणाची वाच्यता एका मुलींनं तिच्या एका मैत्रिणीकडं केली. त्यानंतर हा सगळा किळसवाणा प्रकार समोर आला. केज तालुक्यात ही घटना घडली आहे.
तिन्ही मुलींसोबत नेमकं काय झालं?
शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचं काम करणाऱ्या बापाने आठ वर्षांपूर्वी आपल्याच एका मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या मुलीसोबतही अशाच प्रकारचं कृत्य केलं. या दोन्ही घटना मुलींनी जिवाच्या भीतीपोटी सहन केल्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलींची आई गावाला गेल्यानंतर बापाने तिसऱ्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ३१ मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुली झोपलेल्या असताना त्यांच्या खोलीत जाऊन मोठ्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे आईला सांगू नको म्हणून मुलीला काठीने मारहाण केली. त्याचबरोबर दोरीनं गळा आवळून जिवे मारण्याचाही प्रयत्न केला, असं पीडित मुलींनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
… आणि घटना आली समोर
स्वतःच्या बापाकडूनच होत असलेला अत्याचार सहन न झालेल्या एका मुलीनं तिच्या मैत्रिणीला ही सर्व घटना सांगितली. त्यानंतर मैत्रिणीनं हा सर्व प्रकार तिच्या मावशीला सांगितला. त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं पोलिसांशी संपर्क करण्यात आला. पीडित मुलीनं वरिष्ठ पोलीस अधिकारी आमि पोलीस निरीक्षकांशी संपर्क करून आपली कैफियत सांगितली. संपूर्ण घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पीडित मुलींची सुटका केली. त्याचबरोबर मुलींच्या तक्रारीवरून नराधम पित्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, मुलींची आई, भाऊ, चुलता आणि चुलत भाऊ यांच्यावर आरोपीला पाठिशी घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.