लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्या कामगारांना तातडीने वेतन द्या असं सांगणारी एक नोटीस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते हर्ष मांदेर आणि अंजली भारतद्वाज या दोघांनी लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्या कामागारांना त्यांचे किमान वेतन केंद्राने द्यावे यासंदर्भात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावत या कामगारांचे किमान वेतन तातडीने द्यावे असं म्हटलं आहे.
सद्यस्थितीत देश करोनासारख्या महासंकटाचा सामना करतो आहे. अशात करोनाचे संकट गहिरे होताना हातावरचं पोट असलेल्या कामगारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्यामुळे या कामगारांना त्यांचे किमान वेतन तातडीने दिले जावे यासाठी दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीत उत्तर देताना सुप्रीम कोर्टाने केंद्राला यासंदर्भातली नोटीस बजावली आहे.