“देशव्यापी लॉकडाउनला आज ९ दिवस होत आहेत. आजपर्यंत ज्या प्रकारे लोकांनी सहकार्य केलं ते उल्लेखनीय आहे. २२ मार्च रोजी सर्वांनी करोनाविरुद्ध लढणाऱ्यांचे आभार मानले त्याची दखल सर्व देशांनी घेतली आहे. लोकांनी संकट काळात सामूहिक शक्तीचं दर्शन घडवलं आहे. आपण एक होऊन करोनाविरुद्ध लढू शकतो हे आपण दाखवून दिलं आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी देशातील जनतेकडे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटं देण्याचं आवाहनही केलं.
“देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत. ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटं कसं लढू. अजून असे लॉकडाउनचे किती दिवस असतील. आज लॉकडाउन असलं तरी कोणीही एकटं नाही. १३० कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. वेळोवेळी या सामूहिक शक्तीच्या भव्यतेचं दर्शन घडवणं आवश्यक आहे. या महामारीमुळे पसरलेल्या अंध:कारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. ज्यांच्यावर जास्त संकट आलंय अशा गरीब बांधवांना आपल्याला सोबत पुढे घेऊन जायचं आहे. तसंच आपल्याला करोनाच्या संकटाला हरवायचं आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, “१३० कोटी लोकांच्या महासंकल्पाला आपल्याला आता पुढे घेऊन जायचं आहे. मला ५ एप्रिल रोजी रात्री तुमच्या सर्वांची नऊ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यावर उभं राहून ९ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट सुरू करा. त्यावेळी घरातील सर्व लाईट बंद केल्यानंतर जेव्हा हा प्रकाश उजळेल तेव्हा आपण एकाच ध्येयानं लढत आहोत हे सिद्ध होईल. त्यावेळी प्रत्येकानं आपल्या मनात संकल्प करा की आपण या लढ्यात एकटे नाही,” “परंतु यावेळी कोणीही एकत्र जमू नये. तसंच सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मण रेषाही आपल्याला तोडायची नाही हे ध्यानात ठेवावं. करोनाची साखळी तोडण्याचा हा रामबाण उपाय आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

अधिक वाचा  बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीसाठी टेन्शन वाढवणारी बातमी