उस्मानाबाद : कोरोना विषाणू बाधित दोन रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण उमरगा तालुक्यातील असून दुसरा रुग्ण लोहारा तालुक्यातील धानुरी येथील असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी मुंबई येथून लोहाऱ्यातला तरुण आला होता. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये तो काम करत असल्याची माहिती समोर आली.

ताज हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेऊन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच या तरुणाच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. तर उमरगा तालुक्यातील बलसुर येथे सापडलेला कोरोनाबाधीत रुग्ण हा दिल्ली आणि पानिपत येथे कार्यक्रमानिमित्त गेला होता. उमरगा येथे तो काही दिवसांपूर्वी आला होता, त्यांनतर त्याचे स्वॅब नमुने घेतले होते त्यातील त्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

अधिक वाचा  खडकवासला नवी चर्चा महायुतीत ‘बंडाळी’ची तर यामुळं ‘तुतारी’ही उमेदवार बदलण्याची नवी शक्यता

उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षात त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. बलसुर येथील हा रुग्ण पॉझिटिव्ह आहे, पण त्याच्या पत्नीचा अहवाल निगेटीव्ह आहे. पानिपत आणि हॉटेल ताजमार्गे कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्याची बाब उघड झाली आहे. एकाच दिवसात दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून, नागरिक धास्तावले आहेत.