मुंबई: राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, राज्यातील जनतेशी संवाद साधला. करोनाशी लढ्याचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा जवळ आला आहे, असं ते म्हणाले. या करोनाविरुद्धच्या लढ्यात आपण जिंकणारच असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक फोन आले. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात येणार नाही. करोना संकटात आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून प्रयत्न करत आहोत, असंही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे:
- सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कापलेलं नाही. गैरसमज करून घेऊ नका.
- आर्थिक घडी बसवण्यासाठी आपण ही मांडणी करत आहोत. वेतन टप्प्याटप्प्यात देण्यात येणार आहे.
- थंड पेय, थंड पाणी पिऊ नका. उन्हाळ्याचे दिवस असले तरी, एसी सुरू करू नका. खिडक्या उघड्या ठेवा.
- परदेशातून आलेल्या व्यक्तींनी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
- खासगी दवाखाने डॉक्टरांनी बंद ठेवले आहेत. आता तुमची खरी गरज आहे. त्यामुळं दवाखाने खुले ठेवा.
- सर्दी, खोकल्याव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करा. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळले तर त्यांना सरकारी दवाखान्यात पाठवा.
- मजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये. आहात तिथेच थांबावे. निवास आणि जेवणाची व्यवस्था केली आहे.
- जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळं स्थलांतर करण्याची गरज नाही.
- मजूर आणि कामगारांसाठी जवळपास हजार केंद्रे सुरू केली आहेत. दोन-सव्वा दोन लाख मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
- अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार.
- एकच मंत्र, अनावश्यक गर्दी करायची नाही.
- हे संकट आहे, हे युद्ध आहे, या युद्धामध्ये आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच!
- मेडिकल, फार्मसी, दिवसरात्र काम करणारे एसटी, बेस्ट कर्मचारी आहेत, सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आपण सगळे २४ तास घरी जरी असलो तरी ही सगळी लोकं २४ तास आपल्यासाठी रस्त्यावर आहेत.
- जीवनावश्यक वस्तूंचा साठा, अन्नधान्याचा साठा आपल्याकडे पुरेसा आहे, मुबलक आहे. त्याच्यात कुठेही टंचाई होणार नाही, होऊ देणार नाही.