‘बस बॉर्डर तक छोड दो साहब… हमारे गाववाले वहाँ से हमे अपना लेंगे… यहाँ पे खानेपिनेकी व्यवस्था अच्छी है, पर घरवालोको चिंता सता रही है… एक बार घर पहुच जाए, तो जान मे जान आ जाएगी…’ अशी आर्त हाक करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अडकून पडलेले विविध राज्यांतील मजूर देताहेत. मजुरांच्या स्थलांतरणातून करोना संसर्ग होऊ नये, यासाठी अमरावती मार्गावरील ‘अग्रसेन भवन’सह विविध भागांमध्ये स्थानबद्धता छावण्या (डिटेन्शन कॅम्प) सुरू करण्यात आल्या आहेत. जेवणाची, राहण्याची सोय प्रशासन करत आहे. डॉक्टरांद्वारे तपासणी होतेय. पण, कुटुंबाची ओढ काही केल्या यांना चैन पडू देत नाहीये.
शहरातील मिहान, खापरी येथील प्रकल्पांसह बुटीबोरी आणि हिंगणा या औद्योगिक वसाहतींमध्ये विविध राज्यातील मजूर काम करतात. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारने लॉकडाउन पुकारला. प्रकल्प बंद पडले. मजुरांचा रोजगार नाहीसा झाला. अशा स्थितीत परप्रदेशात किती दिवस राहायचे म्हणून आपल्या देशाकडे जाण्यासाठी पावले निघालीत. पण हायरे नशीब, दळणवळणाच्या सर्व सेवाच बंद. नशिबी पायपीट आली. चालून चालून तरी किती चालणार? एका वळणावर प्रशासनाने स्थलांतर करणाऱ्या या कामगारांना स्थानबद्धता छावण्यांमधे धाडले. येथे त्यांना दोन वेळचे जेवण, चहा देण्यात येत आहे. आंघोळ, शौच आदी दैनंदिन विधीसाठी पर्याप्त सुविधा उपलब्ध आहेत. पण घरून येणारा कॉल कणखर पुरुषालादेखील रडवेला करून जात आहे. काही तर कुटुंबीयांच्या आठवणीने दिवसभर रडून घालवित आहेत. ‘आपण इकडे उर्वरित संपूर्ण कुटुंब दुसरीकडे. पैशासाठी, पोटापाण्यासाठी दुसऱ्या मुलखाची कास धरली. भविष्यात ही वाट इतकी भयावह ठरेल, याचा विचारदेखील केला नव्हता. रोज मोबाइलवर बातम्या पाहतोय. घरचेदेखील सर्व परिस्थिती जाणून आहेत. तरीदेखील कुणाचा धनी, कुणाचा पोटचा पोर, कुणाचा बाप त्याला जवळ हवा आहे. प्रशासनाने विदेशातील भारतीयांना सोडविण्यासाठी विशेष विमान पाठविले. आमच्यासाठीदेखील काही तरी उपाययोजना करायला हवी. आम्ही मजूर आहोत. काही गुन्हेगार नाहीत. अशा प्रकारची स्थानबद्धता न देता आम्हाला स्वकियांपर्यंत पोहचविण्याची सोय सरकारने करावी,’ अशी विनंती राजस्थानमधील नागौर येथील ओमप्रकार कालेरा यांच्यासह अनेकांनी केली आहे.
हवं तर आम्ही पैसे देऊ
आज आमच्याकडे पैसे नाही. पण, प्रशासनाने आम्हाला बॉर्डरपर्यंत सोडल्यास तिथे जाऊन आम्ही प्रवासाचे पैसे देऊ. फक्त आम्हाला आमच्या राज्यात जाऊ द्या. येथे राहून कुटुंबाच्या चिंतेत दिवस घालवून काय करणार? सोबत राहून तर एकमेकांना आधार देऊ शकू, अशी भावना मजुरांनी व्यक्त केली.
‘अग्रसेन भवना’त १८६ जणांची सोय
प्रशासनाने ‘अग्रसेन भवना’त १८६ मजुरांची राहण्याची सोय केली आहे. सुरक्षित अंतर ठेवत त्यांना राहण्यास सांगण्यात येत आहेत. महिलांसाठी विशेष खोल्यांची व्यवस्था आहे. यात गोंदिया, राजनांदगाव (छत्तीसगड), बहल (हरयाणा), मध्यप्रदेशातील सिवनी, छिंदवाडा, बालाघाट आणि राजस्थानमधील नागौर, ओडिसा, आंध्रप्रदेश, झारखंड, उत्तरप्रदेश येथील मजुरांचा समावेश आहे. ‘अग्रसेन भवन’शिवाय शहरातील काही भागांतील मंगल कार्यालय, छात्रावास, शाळांमध्ये छावण्या सुरू केल्या आहेत. यात सीताबर्डी, टेम्पल बाजार, डिप्टी सिग्नल, टिमकी, सदर, इंदोरा या परिसरांचा समावेश आहे.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटला, ‘या’ दिवशी जाहीर होणार पहिली यादी