करोनामुळे लांबणीवर पडलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्षांच्या उत्तरार्धात कार्यक्रमपत्रिकेत स्थान दिले तरच होऊ शकेल. परंतु आंतरराष्ट्रीय मालिकांच्या आव्हानांमुळे ‘आयपीएल’ न झाल्यास खेळाडूंना मानधन देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. त्याचा फटका स्थानिक क्रिकेटपटूंना बसणार आहे, असा इशारा भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेने दिला आहे.
‘‘खेळाडूला ‘आयपीएल’चा हंगाम सुरू होण्याच्या एक आठवडा आधी मानधनाच्या १५ टक्के रक्कम मिळते. मग स्पर्धा चालू असताना ६५ टक्के रक्कम दिली जाते. उर्वरित २० टक्के रक्कम स्पर्धा संपल्यानंतर निर्धारित दिवसांमध्ये खेळाडूला दिली जाते. ‘बीसीसीआय’च्या मार्गदर्शक सूत्रांनुसार अद्याप कोणत्याही खेळाडूला पैसे देण्यात आलेले नाही,’’ असे ‘आयपीएल’शी निगडित सूत्रांनी सांगितले.
‘आयपीएल’ न झाल्यास कोटय़वधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंनाही याचा फटका बसेल, असे भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी सांगितले.
‘‘साथीच्या रोगांसाठी विम्याचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना कोणत्याही प्रकारे पैसे मिळणार नाहीत. प्रत्येक संघाला खेळाडूंच्या मानधनासाठी ७५ ते ८५ कोटी रुपये खर्च होतो. परंतु मैदानावर कोणताही खेळ झाला नसताना संघमालक खेळाडूंना पैसे कसे देतील,’’ असा सवाल मल्होत्रा यांनी केला आहे.
‘‘इंग्लिश प्रीमियर लीग, ला लिगा, बुडेस लिगा अशा अनेक फुटबॉल लीगमधील खेळाडूंवर वेतनकपात लादण्यात आली आहे. याचप्रमाणे परिस्थिती सुरळीत होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्याप्रमाणेच २०, ४० किंवा ६० लाख रुपये मानधन मिळवणाऱ्या खेळाडूंना त्याचा फटका बसेल. ‘बीसीसीआय’ या खेळाडूंसाठी काही तरी योजना आखेल,’’ अशी अपेक्षा मल्होत्रा यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  ‘प्रणिती शिंदे खासदार झाल्या, त्या फक्त…’, शिवसेना शिंदे गटाचा प्रणिती शिंदेवर आरोप?