नवी दिल्ली : ‘राजस्थानातील सिकारमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलीला तिचा पेशाने शिक्षक असलेला नवरा अमानुषपणे मारहाण करत आहे,’ अशी तक्रार तिच्या वडिलांनी केली आहे. कुणी नवऱ्याच्या रागाचे लक्ष्य होतेय तर कुणाला जेवायची भ्रांत आहे. ही प्रातिनिधिक उदाहरणे. पण करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याचा सगळ्यात विपरित परिणाम हा घरातील नातेसंबंधांवर होत असल्याचे चित्र आहे. २४ तास घरातच राहावे लागत असल्याचे नैराश्य आणि राग घरातील पुरुष पत्नीवर काढत आहेत. त्यातून घरगुती छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
२४ मार्चपासून देशभरातील नागरिक घरातच अडकून पडले आहेत. याच काळात राष्ट्रीय महिला आयोगाकडे आलेल्या घरगुती छळाच्या तक्रारींचा आकडा चिंता करायला लावणारा आहे. २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत फक्त ई-मेलद्वारे आलेल्या या तक्रारींचा आकडा ५८ आहे. यातील बहुतांश तक्रारी या पंजाब आणि उत्तर भारतातून आल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितले. घरातच राहावे लागत असल्याने पुरुषांमध्ये नैराश्य वाढत आहे. त्यामुळेच हा राग ते घरातील महिलांवर काढत आहेत, असे निरीक्षण शर्मा यांनी नोंदवले. ५८ आकडा हा ई-मेलद्वारे आलेल्या तक्रारींचा आहे. मात्र प्रत्यक्ष घटना अधिकच असण्याची शक्यता आहे. ई-मेल वापरू न शकणाऱ्या वर्गातील अनेक महिला या पोस्टाद्वारे तक्रारी पाठवत असतात. त्याचे प्रमाणही अधिक असते, असे त्या म्हणाल्या. राज्य महिला आयोगांकडेही अशाच स्वरूपाच्या तक्रारी येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांनी कोणत्याही प्रकारचा छळ सहन न करता राज्य आयोग किंवा पोलिसांकडे मदत मागावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘वेळेत मदत मिळावी’
घरामध्ये होणाऱ्या त्रासाबाबत महिलांच्या तक्रारी येत असल्याचा अनुभव महिला हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थांनीही मांडला आहे. लॉकडाऊनबाबत आधीच माहिती मिळाली असती, तर राहण्यासाठी सुरक्षित पर्यायाचा विचार केला असता, अशा भावना महिला व्यक्त करत आहेत. सध्याच्या काळात अडचणीत असलेल्या महिलांना तातडीने मदत मिळून सुटका व्हावी. अन्यथा त्यांची परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते, अशी चिंता ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह विमेन्स असोसिशन’च्या सचिव कविता कृष्णन यांनी व्यक्त केली.
मार्चमध्ये महिला आयोगाकडे आलेल्या एकूण तक्रारी २९१
(२३ मार्चपासून केवळ ई मेलवर तक्रारी येत आहेत)
फेब्रुवारी : ३०२
जानेवारी : २७०

अधिक वाचा  भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? ‘या’ नावांची चर्चा हे तिन्ही नेते अमित शाह यांचे जवळचे निर्णयही लवकरच