करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कोणीही आपल्या घराबाहेर पडू नये असं आवाहनही सतत प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. तरी अनेकदा हे नियम धाब्यावर बसवून अनेक जण बाहेर फिरताना दिसतात. अशा लोकांना अद्दल घडवण्यासाठी बीडमधील एका गावातील गावकऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. जर एखादी व्यक्ती तीनपेक्षा अधिक वेळा गावातून बाहेर पडल्यास ५०० रूपये दंड आणि गाढवावरून धिंड काढण्यात येईल, असं ग्रामस्थांनी ठरवलं आहे.
सर्वत्र लॉकडाउन असतानाही बीडमधील टाकळी गावात अनेकजण विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामस्थ आणि सरपंचांनी मोठा निर्णय घेतला आहे. एखादी व्यक्ती तीनपेक्षा अधिक वेळा बाहेर आल्यास त्याच्याकडून पाचशे रूपये दंड आणि त्याची गाढवावरून धिंड काढण्यात येईल, असा ठराव करण्यात आला.
गावात घेण्यात आलेला हा निर्णय दवंडीमार्फत सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त पारावर बसून गप्पा मारणाऱ्यांनाही चाप घालण्यासाठी सरपंचांनी पाराला डांबर फासण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त कोणालाही आपली गाढवावरून धिंड निघून ये असे वाटत असल्यास त्यांनी आपल्या घरातच थांबून सहकार्य करावं, असा इशाराही देण्यात आला आहे.