मुंबई: कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत देशातील अनेक दानशूर पुढे येऊन सरकारला मदत करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला ५०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. यानंतर भारतीय उद्योगविश्वातील आणखी एक प्रतिष्ठित दानशूर सरकारच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
विप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्राईज आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी थोडीथोडकी नव्हे तर ११२५ कोटीची मदत करण्याचे ठरवले आहे. यापैकी विप्रो लिमिटेड १०० कोटी, विप्रो एन्टरप्रायजेस २५ कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन १००० कोटी रुपये देऊ करणार आहे. या पैशांमुळे मानवजातीला कोरोनापासून वाचवण्यासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला मदत होईल, असे अझीम प्रेमजी फाऊंडेशनने म्हटले आहे.
यापूर्वी देशातील अनेक उद्योग समूहांनी मदतीचा हात पुढे केला होता. यामध्ये टाटा ट्रस्ट आणि टाटा ग्रूप यांनी एकत्रितपणे १५०० कोटी रुपये देऊ केले होते. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी ५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तर इन्फोसिस या उद्योग समूहाने तब्बल १०० कोटीची मदत सरकारला देऊ केली आहे. तसेच महिंद्रा समूहाने कोरोनाच्या रुग्णांना लागणाऱ्या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करायला सुरुवात केली होती. महिंद्राकडून महिन्याला ३००० व्हेंटिलेटर्स तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठी मदत होईल.

अधिक वाचा  समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय