मुंबई : करोनाने मुंबईत हातपाय पसरायला सुरुवात केल्यामुळे हा संसर्ग थांबवण्यासाठी मुंबई महापालिके ने शहरातील अनेक इमारती, वसाहती यांमध्ये कठोर संचारबंदी लागू के ली आहे. करोनाचा एखादा रुग्ण आढळला तरी ती व्यक्ती राहत असलेली इमारत तातडीने ताब्यात घेऊन इमारतीत ये-जा करण्यास मज्जाव केला जात आहे.
सर्वत्र टाळेबंदीमुळे शांतता असताना आणि करोनावरून विनोद सुरू असताना अचानक एखाद्या इमारतीखाली रुग्णवाहिका येऊन थांबते. आरोग्य कर्मचारी एखाद्या घरातल्या सर्वाना त्यात बसवून घेऊन जातात. मग दुसऱ्या दिवशी पोलीस येऊन घोषणा करतात आणि ती इमारत १४ दिवस प्रवेशासाठी बंद केली जाते. आतले रहिवासी बाहेर येऊ शकत नाहीत की बाहेरचे आत जाऊ शकत नाहीत.
आतापर्यंत केवळ परदेशात जाऊन आलेले किंवा त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत मर्यादित असलेला कोरोना आता स्थानिकांपर्यंत पोहोचू लागला आहे. रुग्णवाहिकेत बसवून कोणाला घेऊन जात आहेत, कुठे पोलीस ध्वनिक्षेपकावरून घोषणा करून इमारत ताब्यात घेतल्याचे सांगतायत अशा ध्वनिचित्रफिती त्या त्या विभागात फिरू लागल्या आहेत. आजार आपल्या दारापर्यंत आल्याच्या भावनेने या आजाराबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण तर निर्माण झाले आहेच, पण गांभीर्यदेखील निर्माण झाले आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी घाटकोपरमध्ये एक इमारत अशा प्रकारे बंद करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू मुंबईतील बऱ्याचशा भागातील इमारतीत अशा प्रकारे टाळेबंदी करण्यात आली आहे.
वरळी कोळीवाडा या संपूर्ण गावठाण्यातच सोमवारी ‘प्रवेश बंद’ करण्यात आला. तर मुंबईचे एक टोक असलेल्या दहिसर पूर्वमधील शैलेंद्र नगर येथील मधुसूदन सोसायटीत २ रुग्ण, तर आंबेवाडी येथील वाल्मीकी चाळीत १ रुग्ण आढळला. त्यामुळे या दोन्ही वसाहती सोमवारी बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर सोमवारी गोरेगाव येथील बिंबिसार नगर ही उच्चभ्रू वसाहतदेखील बंद करण्यात आली. या वसाहतीत अनेक मराठी कलाकार राहतात.
मंगळवारी शीव येथील जैन सोसायटीतील मनोहर निवास ही इमारत बंद करण्यात आली. गेल्या आठवडय़ात ग्रँट रोड येथील ऑरबिट या टोलेजंग इमारतीत एक रुग्ण आढळल्यामुळे या इमारतीबरोबरच समोरचा भाजीबाजारही बंद करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलच्या बेलसीस रोड येथील ‘ऑर्चिड एनक्लेव्ह’मध्ये एक रुग्ण आढळल्यानंतर सोसायटीच्या दोन्ही इमारती बंद करण्यात आल्या. अंधेरी लोखंडवाला येथे रेड रोज इमारतीत अमेरिकेहून आलेल्या व्यक्तीला करोना झाल्यानंतर ही इमारत बंद करण्यात आली होती. तर खार येथील १० वा रस्ता येथील संदीप इमारतदेखील पोलिसांनी बंद केली होती. गिरगावात इमारत बंद करण्यात आलेली नसली तरी ठाकूरद्वारचा बाबासाहेब जयकर मार्ग आणि भेंडीबाजारजवळची निजाम स्ट्रीट हे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
टाळेबंदीनंतर..
ज्या इमारतीत रुग्ण आढळतो ती संपूर्ण इमारत ताब्यात घेतली जाते. त्या इमारतीतील रहिवाशांना काहीही सामान आणण्यासाठीही बाहेर जाता येत नाही की बाहेरून कोणाला आत येता येत नाही. इमारतीतून एकही वाहन बाहेर जाऊ शकत नाही की आत येऊ शकत नाही. संपूर्ण इमारत र्निजतुक केली जाते. तसेच इमारतीतील सर्व रहिवाशांची तपासणी केली जाते. इमारतीत कोणालाही घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी नसते.