जामखेड शहरातील तिघाजणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यतील करोना बाधितांची संख्या आठ झाली आहे. त्यापैकी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले असून सात रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. करोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने मोहीम उघडली असून परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.
जामखेड येथील एका धार्मिक स्थळात थांबलेल्या परदेशी नागरिकांपैकी दोघांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या दोघांवरही रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्र्यांची व त्यांच्या संपर्कात आलेल्या जामखेड येथील व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू शोधसंशोधन संस्थेकडून अहवाल प्राप्त झाला. त्यात त्यांच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. प्रशासनाने या तीन व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींनाही ताब्यात घेतले आहे. या व्यक्ती इतर कोणाच्या संपर्कात होत्या. गेल्या काही दिवसात कोणाकोणाला त्या भेटल्या, याची माहिती घेणे सुरू झाले आहे. या व्यक्ती साधारणत: तीस ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
संपर्कात आलेल्या या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य यंत्रणेने हाती घेतली आहे. आतापर्यंत आरोग्य यंत्रणेने ३७६ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील २८५ व्यक्तींचे अहवाल हे नकारात्मक आले. आतापर्यंत ८ व्यक्तींचे अहवाल हे सकारात्मक आले. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल चौदा दिवसांनंतर नकारात्मक आला. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. उर्वरित रुग्णांना बूथ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने आता बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे, त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविणे, याला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत चारशेहून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सध्या अजून ५८ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल उद्या दुपापर्यंत येणे अपेक्षित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले. रुग्णालयात सध्या असलेल्या सातही करोनाबाधीत रुग्णांची तब्येत स्थीर असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वत:हून तपासणी करून घेण्याचे आवाहन
करोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांनी तपासणी करून घ्यावी. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे. स्वत:च्या व समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
धार्मिक स्थळांची तपासणी सुरू
जिल्ह्यतील विविध धार्मिक स्थळांमध्ये जनता संचारबंदी लागू होण्यापूर्वी राज्याच्या विविध भागातून लोक आले होते. जामखेड व नेवासे येथे काही परदेशी नागरिक तसेच राज्याच्या विविध भागातील लोक आढळून आले. त्यानंतर धार्मिक स्थळांची तपासणी सुरू केली. श्रीरामपूर व शिर्डी येथील धार्मिक स्थळात राज्यातील काही नागरिक आढळून आले. श्रीरामपूर येथे असे नागरिक आढळून आले असून त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय प्रशासन घेणार आहे.

अधिक वाचा  कोथरूडमध्ये प्रथमच महा ‘कन्यापूजन’ दोन दिवसातच विक्रमी ५००० बालिकांची नोंदणी: नामदार चंद्रकांतदादा पाटीलांचा पुढाकार