वर्धा : वर्धेतील गरजूंसाठी २० लाख रुपयांच्या धान्याची मदत करण्याचा निर्णय बजाज परिवाराने घेतला असून उद्या मंगळवारपासून शिक्षा मंडळचे स्वयंसेवक स्वत: वाटप करणार आहेत.
समाजाने समाजाच्या कामात आले पाहिजे, या विनोबाजींच्या उक्तीनुसार हे कार्य करण्याचे ठरले आहे, अशी संस्थेचे विश्वस्त संजय भार्गव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नमूद केले. सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज सर्वेसर्वा असलेल्या जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे.
भूमिपुत्र असलेला बजाज परिवार पुणे निवासी असला तरीही वध्रेतील विविध उपक्रमात नियमित सहभाग असतो. करोनाच्या पाश्र्वभूमीवर वध्रेतील गरजू व झोपडपट्टी परिसरातील कष्टकऱ्यांचे काम ठप्प झाले आहे. त्यांना मदत केली पाहिजे म्हणून पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, ७५० ग्रॅम खाद्यतेल व एक साबण प्रत्येक कुटुंबास दिल्या जाईल. पहिल्या टप्प्यात शहरात व लगतच्या ग्रामपंचायत परिसरात मदत मिळेल. पुढे ग्रामीण भागात ही सेवा सुरू होईल.
मदतीचा पहिला टप्पा सहा हजार कुटुंबापर्यंत आहे. मदतीला मर्यादा नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले. मदत करताना संस्थेचे कर्मचारी स्थानिक नगरसेवक किंवा जबाबदार व्यक्तीची मदत घेतील. विश्वस्त संजय भार्गव यांनी सांगितले की, प्रशासनाशी बोलणे झाले आहे. रितसर परवानगी घेऊन मदत वाटप होणार आहे. विनोबाजींनी लोकनीतीत सांगितलेले सूत्र या कार्यामागे असल्याचे ते म्हणाले.

अधिक वाचा  लक्ष्मण हाकेंवर दारु पिल्याचा आरोप, मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?