केईएम रुग्णालयातील डॉक्टर, तसेच परिचारिकांना रुग्णांपासून संसर्ग झाल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्यात आता नायर रुग्णालयाचीही भर पडली आहे. नायरमध्ये एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सकाळच्या सत्रातील २० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नायर डेंटल रुग्णालयात पाच दिवस विलगीकरणासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या थुंकीचे नमुने घेऊन पुढे १४ दिवस त्यांचे घरामध्ये विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
श्वसनविकाराचा त्रास असलेल्या एका रुग्णाला दोन दिवसांपूर्वी नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचे कोव्हिड चाचणीचे नमुने सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सकाळच्या सत्रातील २० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नायर डेंटल रुग्णालयात येथे पाच दिवस विलग ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या थुंकीचे नमुने घेऊन पुढे १४ दिवस त्यांना घरात विलग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नायर रुग्णालयात आलेल्या या रुग्णाला श्वसनविकाराचा त्रास होता. हा रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात गेला नव्हता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितल्यामुळे कोव्हिडची चाचणी न करता त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले, असा आक्षेप वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कस्तुरबामध्ये जागा नसल्यामुळे आता त्या रुग्णाला ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आल्याचे खात्रीलायकरित्या कळते. विलग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिडची चाचणी सकाळी आल्यामुळे या रुग्णाला हा संसर्ग झाला होता, याची माहिती कर्मचाऱ्यांना नव्हती. कोणताही रुग्ण दगावू नये, यासाठी डॉक्टर प्रत्येक रुग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. या बाधित रुग्णामुळे दिवसपाळीत असलेल्या परिचारिकांप्रमाणे रविवारी रात्रपाळीला असलेल्या परिचारिकांनाही घरातच विलग करण्यात आल्याचे कळते. पालिका रुग्णालयाचे संचालक व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याशी सातत्याने संपर्क साधूनही ते होऊ शकले नाहीत.
केईएममध्ये एक बाधित
केईएम रुग्णालयात आणखी एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ही महिला असून, रविवारी रात्री त्यांना कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आले. या महिलेच्या संपर्कात आलेल्या १६ वैद्यकीय तज्ज्ञ, तसेच डॉक्टरांना विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉक्टर आणि परिचारिकांचा समावेश आहे.
‘ते’ पाच जण विलगीकरण कक्षात
शनिवारी एका ४० वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मेडिसिन विभागातील सर्व निवासी डॉक्टरांना वसतिगृहामध्ये विलग ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विभागात त्यावेळी कार्यरत असलेल्या परिचारिकांसह इतर निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही विलग राहण्यास सांगितले आहे. सैफी रुग्णालयातील करोनाचा संसर्ग झालेल्या हृदविकारतज्ज्ञांच्या थेट संपर्कात १४ जण आले असून, यातील पाच जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तर त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या पाच रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

अधिक वाचा  लाडकी बहिण योजनेवरून मनोज जरांगेंची सरकारवर जोरदार टीका ; 1500 रुपये आम्हाला…