नवी दिल्लीः देशातील करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ११०० च्या वर गेली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून कामाला लागल्या आहेत. तसंच देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला गेला आहे. अशा परिस्थितीत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देशातील सर्व मशिदी बंद करण्याची मागणी केलीय. इस्लामचे तज्ज्ञ आणि अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांच्या वक्तव्या आधार घेत यासंदर्भात एक ट्विट केलंय.
करोना महामारीचे संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद कराव्यात, असा फतवा दारूल उलूम देवबंद यांनी काढावा अशी मागणी अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांनी केलीय. ताहिर महमूद यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. करोनाच्या संकटामुळे जर काबा आणि मदीनातील मशिदी बंद होत असतील तर भारतातील मशिदी का बंद होत नाहीए?, असं जावेद अख्तर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
दरम्यान, देवबंदचे मौलाना मुफ्ती अबुल कासिम नोमानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिलंय. दारूल उलूमची इमारत आयसोलेशन वॉर्डसाठी साठी वापरता येईल, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. संकटाच्या या काळात देवबंद दारूल उलूम जनता आणि सरकारसोबत आहे, असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  अल्का याज्ञिक यांना आता कधीच ऐकू येणार नाही? काय म्हणाले डॉक्टर?