नवी दिल्लीः दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने दिशाभूल केल्यामुळे परप्रांतीय मजूर आणि कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला, अशी टीका केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलीय. लॉकडाऊन तीन महिन्यांपर्यंत वाढू शकतो, अशी दिशाभूल केजरीवाल सरकारने मजुरांची केली. पण देशातील लॉकडाऊन हा १४ एप्रिलपर्यंतच आहे. त्यात कुठलीही वाढ होणार नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलंय.
देशातील लॉकडाऊन तीन महिन्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे. ही अफवा पसरल्याने उत्तर प्रदेश आणि बिहारसह इतर राज्यांमधील मजूर आणि कामगार एकाचवेळी दिल्लीतून बाहेर पडू लागले. यामुळे त्यांच्यासह अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला, असा दावा केंद्रातील सूत्रांनी केला. ‘दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने लॉकडाऊन तीन महिने चालेल, अशी दिशाभूल करणारी माहिती पसरवली. दिल्ली सरकारने लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांकरता पास देण्यात येत असल्याचे सांगितले. हे जाणूनबुजून केले गेले,’ असं केंद्रातील उच्च पदांवरील सूत्रांनी सांगितलं.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना जायचं असेल त्यांनी आनंद विहार आणि धौल कुआं बस स्थानकावर जावे, असं लाऊड स्पिकरवरून दिल्लीत सांगण्यात येत होती. हा प्रकार अतिशय चुकीचा आणि निंदनीय आहे. यामुळे मजूर आणि कामगारांची दिशाभूल झाली. आणि दिल्ली सरकार याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारकडे बोट केलं. पण दिल्ली सरकारलाच परिस्थिती नीट हाताळता आली नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
गावांकडे परतणाऱ्या कामगारांसाठी उत्तर प्रदेश सरकारने बसेसची व्यवस्था केली आहे, असं सांगून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची दिशाभूल केली. त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारकडून बसेसची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. पण केजरीवाल यांच्या सूचनेमुळे मजुरांमध्ये बस सुरू झाल्याचा चुकीचा संदेश गेला. आपल्याला गावी सोडण्यासाठी मोफत बसची सुविधा केली गेली आहे, असं कामगारांना वाटलं. तसंच लॉकडाऊन वाढणार असल्याचा समज निर्माण झाल्याने सर्वत्र संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. ‘आप’ सरकारडून अशा संकटाच्या परिस्थितीत अतिशय गलिच्छ राजकारण केलं गेलं, असा आरोप सूत्रांनी केला.
‘आप’कडून करण्यात आलेले ट्विट्स हे अर्बन नक्षलवादी विचारांचे होते. यामुळे अधिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तसंच दोन लाख नागरिकांना जेवण देत असल्याचा खोटा दिल्ली सरकारकडून केला, यावरी टीका करण्यात येतंय. हजारो मजुरांची गर्दी बस स्थानकांवर ओसंडल्याने या मागे कट असल्याचा आरोप आधीच भाजपचे सरचिटणीस बी.एल. संतोष यांनी केलाय.

अधिक वाचा  अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा, महायुतीच्या जागावाटपावर मोठं वक्तव्य