हैदराबादः तेलंगणमध्ये सोमवारी करोना व्हायरसने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सहा जण दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते, असं सांगण्यात येतंय. यापैकी दोघांचा मृत्यू हा गांधी हॉस्पिटलमध्ये तर इतरांचा अपोलो, ग्लोबल, निजामाबाद आणि गडवाल येथील हॉपिस्टल्समध्ये झाला आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज तबलिगी जमातच्या मुख्यालयात धार्मिक कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या धार्मिक कार्यक्रमात जवळपास ३०० ते ४०० जण सहभागी झाले होते. यापैकी जवळपास २०० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात येतय. करोनाची लक्षणं आढळल्याने दिल्लीतील लोकनायक हॉस्पिटलमध्ये यातील १६३ जणांना दाखल करण्यात आलंय.
मौलाना विरोधात एफआयआर दाखल
दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलमध्ये सध्या करोनाचे १७४ रुग्ण दाखल आहेत. यापैकी १६३ जण हे निजामुद्दीनमधील आहेत. रविवारी ८५ जणांना दाखल करण्यात आलं. तर सोमवारी ३४ जण दाखल झाले. हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली सरकारने मरकजच्या मौलानांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन असतानाही मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आणि त्याची परनावगीही न घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या करोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी निजामुद्दीनमध्ये बसेस दाखल झाल्या आहेत. जे कुणी तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांनी प्रशासनाला माहिती द्यावी. सर्वांची करोनाची चाचणी केली जाईल. चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील. ज्या कुणाला यासंदर्भात माहिती आहे त्यांनी थेट सरकारला माहिती द्यावी, असं तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.

अधिक वाचा  टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर